जिल्ह्यात चक्क 3528 आजी – आजोबांनी दिली 745 परीक्षा केंद्रांवरून अनोखी परीक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सर्वसाक्षरता अभियानंतर्गत जिल्हास्तरावर शिक्षण विभागाकडून अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. तसेच कुणीही निरक्षर राहू नये, या उद्देशाने शासन स्तरावरून उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येतो. काही दिवसांपूर्वी निरक्षरांच्या नोंदी घेत त्यांना साक्षर करण्याच्यादृष्टीने पावले उचलण्यात आली. दरम्यान, या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील ७४५ परीक्षा केंद्रांवर नुकतीच चक्क ३ हजार ५२८ आजी-आजोबांनी उपस्थिती लावत परीक्षा दिली. यावेळी पंच्याहत्तरी ओलांडलेल्या असाक्षरांनी परीक्षेतून आनंद घेतला.

केंद्राच्या नव भारत साक्षरता अभियानांतर्गत नोंदणी झालेल्या प्रौढ निरक्षरांची जिल्हा परिषदेच्या योजना शिक्षण विभागाच्या माध्यमातून गत महिन्यात दि. 17 मार्च रोजी रविवारी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत ही परीक्षा जिल्ह्यातील ७४५ केंद्रांवर घेण्यात आली. एकीकडे आपली नातवंडे दहावी व बारावीची परीक्षेत गुंतलेले असतानाच नातवंडाच्या शाळा व विद्यालयात चक्क ३ हजार ५२८ आजी-आजोबांनी चक्क बेंचवर बसून परीक्षा दिली तर परीक्षा केंद्रांना राज्याचे शिक्षण उपसंचालक देवीदास कुलाळ व योजना शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी भेटी दिल्या.

यावेळी त्यांनी परीक्षा केंद्रावरील आजी आजोबांशी मनसोक्त गप्पाही मारल्या. परीक्षेत वाचन, लेखन व संख्या ओळखण्यासाठी प्रत्येकी ५० प्रश्न म्हणजेच १५० गुणांची परीक्षा होती. संबंधित परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थीना साक्षर असल्याचे प्रमाणपत्र देखील देण्यात आली.

शिक्षण उपसंचालकांनी दिली परीक्षा केंद्रास भेट

आजी-आजोबांनी शालेय विद्यार्थ्यांप्रमाणे परीक्षा दिली. त्यामुळे शिक्षकांसह अधिकाऱ्यांनाही या परीक्षेचे अप्रूप वाटले. सातारा जिल्ह्यातील क्षेत्रमाहुलीसह अन्य परीक्षा केंद्रांना राज्याचे शिक्षण उपसंचालक देविदास कुलाळ व योजना शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांच्यासह गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांनी भेटी दिल्या.

राज्यात 6 लाख 40 हजार इतक्या असाक्षरांची ऑनलाइन नोंदणी

राज्यात 6 लाख 40 हजार इतक्या असाक्षरांची ऑनलाइन नोंदणी केंद्र शासनाकडे झाली. यातील 6 लाख असाक्षरांनी ही परीक्षा दिली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम 2022 ते 2027 या कालावधीत राबविण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. देशातील 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसित करून महत्त्वपूर्ण जीवनकौशल्ये विकसित करायची आहेत. त्याप्रमाणे नोंदणीकृत असाक्षरांनी चाचणी परीक्षा दिली.

150 गुणांची होती परीक्षा

पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञानावर भर असणारी ही परीक्षा एकूण 150 गुणांची होती. यात वाचनावर आधारित 50 गुण लेखनावर 50 गुण तर संख्या ज्ञानावर आधारित 50 गुण निश्चित करण्यात आले होते. रविवारी ग्रामीण भागात रंगलेल्या या परीक्षा उत्सवात उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागाकरिता 17 गुण असे दीडशे पैकी एकूण 51 गुण अनिवार्य होते. रविवारी सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत या परीक्षेसाठी वेळ निश्चित करण्यात आला होता. तीन तासाच्या कालावधीत परीक्षार्थींना पेपर सोडवावा लागला.