आसाममधील 33 मुख्याधिकारी पोहचले थेट महाबळेश्वरात; घेतली विविध उपक्रमांची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । आसाम राज्यातील नगरविकास विभागाच्या पहिल्या मुख्याधिकारी बॅचच्या ३३ मुख्याधिकारी यांनी महाबळेश्वर नगरपालिकेस सदिच्छा भेट दिली. या ठिकाणी भेट देत महाबळेश्वर पालिकेकडून राबविल्या जात असलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती घेतली.

महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकेतील विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा अभ्यास करण्यासाठी यशदा, पुणे या संस्थेमार्फत मुख्याधिकाऱ्यांच्या या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. ३३ मुख्याधिकाऱ्यांचा समवेत आसाम नगरपालिका प्रशासनाचे सहसंचालक अरविंद सिंग व यशदाचे प्रशिक्षण समन्वयक रागिणी सावंत उपस्थित होते.

यावेळी महाबळेश्वर पालिका प्रशासक योगेश पाटील यांनी सर्व मुख्याधिकाऱ्यांचे स्वागत केले. सहाय्यक प्रकल्प अधिकारी संतोष दड यांनी शहरी दारिद्रय निर्मुलन, महिला सशक्तीकरण, दिव्यांग कल्याण व स्वयं रोजगारासाठी केंद्र व राज्य शासनाकडून राबवत असलेल्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाबाबत, महिला बचत गटाने उभारलेल्या चिक्की प्रकल्पाबाबत माहिती दिली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबवत असलेल्या उपक्रमाची वैभव साळुंखे व मुकेश कुलकर्णी यांनी माहिती दिली.

मालमत्ता कर आकारणी पद्धतीबाबत कर निरीक्षक भक्ती जाधव व सुरज किर्दत यांनी माहिती दिल्यानंतर लेखा विभागातील विविध रेकॉर्ड व कार्य पद्धती बाबतची माहिती लेखापाल प्रशांत म्हस्के, स्वप्निल सूर्यवंशी यांनी दिली. यावेळी महाबळेश्वर पालिकेचे मुख्य लिपिक आबाजी ढोबळे, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.