सातारा प्रतिनिधी । राज्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आणि जिल्ह्याचे पर्यटन वैभव असलेल्या ऐतिहासिक वासोटा किल्ल्याचा (Vasota Fort) ट्रेक नोव्हेंबर महिन्यापासून सुरू झाला असून नैसर्गिक दुर्गमता लाभलेला वासोटा किल्ला पर्यटकांचे आकर्षण स्थान मानला जातो. शिवसागर ओलांडून कोयना अभयारण्यातून या किल्ल्यावर जावे लागते. निबीड जंगल, सदाहरित वृक्षराजी, अथांग जलाशयामुळे या परिसराला एक निराळे वैशिष्ट्य लाभले आहे. ट्रेकर्स पर्यटकांना भुरळ घालणारा म्हणून ओळख असणार्या किल्ले वासोटा पर्यटकांनी वर्दळून गेला आहे. सलग डिसेंबर महिन्यातील सलग दुसऱ्या रविवारी वासोट्यावर 191 बोटींमधून 3035 पर्यटकांनी किल्ले ट्रेक केला.
भैरवनाथ बोट क्लब बामणोली, बोट क्लब शेंबडी, केदारेश्वर बोट क्लब मुनावळे या तीन बोट क्लबमधील सुमारे 191 बोटींतून 3035 पर्यटकांनी किल्ले वासोट्याचा ट्रेक केला आहे. वासोट्यावरुन दिसणारे उंचच उंच कडे अन् प्रचंड खोल दऱ्या मनात धडकी भरवतात. वासोटा पर्यटन सुरू झाल्यामुळे या भागातील मुनावळे, बामणोली शेंबडी, तापोळा, अंबवडे येथील येथील बोट क्लबच्या चालकांमध्ये तसेच स्थानिकांसह, तंबू व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सध्या थंडीची चाहूल लागल्याने वासोटा किल्ला पाहण्यासाठी शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी पर्यटक बामणोली, शेंबडी, मुनावळे या संपूर्ण परिसरामध्ये आदल्या दिवशी मुक्कामासाठी गर्दी करत आहेत. हॉटेल, टेन्ट बुकिंग आठवडाभर अगोदरच फुल्ल होत आहे. त्यातच टेन्टमध्ये राहण्याची मजा काही वेगळीच असून, टेन्टच्या जवळच शेकोटी करून त्याभोवती कराओके गाण्यांची मैफल रंगून रात्र पर्यटक जागवू लागले आहेत.
या परिसरामध्ये मुक्कामाची सोय अपुरी पडल्यावर पर्यटक कोळघर, अंधारी, फळणी, उंबरेवाडी, कास या परिसरातदेखील टेन्ट लावून मुक्कामाचा आनंद लुटत आहेत. बामणोली, शेंबडी, मुनावळे या ठिकाणाहून तास दीड तासाचा बोटीचा प्रवास करून पर्यटक किल्ल्याच्या पायथ्याला गेल्यावर घनदाट जंगलातून ट्रेकला सुरुवात करतात. या घनदाट जंगलातून जाताना वेगवेगळ्या पशू-पक्ष्यांचे आवाज ऐकून तसेच निसर्गसौंदर्याचा आनंद लुटत आहेत.
वासोटा ट्रेकिंगसाठी महत्त्वाच्या गोष्टी
वासोट्याला जंगल ट्रेकिंगसाठी जाताना बामणोलीवरून किंवा मुनावळे, दत्त मंदिर या ठिकाणांहून बोटीने जावे लागते. त्यानंतर वासोट्याच्या पायथ्याला पोचल्यावर किल्ल्याच्या पायथ्याशी घनदाट जंगल असल्याने सूर्यकिरणे जमिनीपर्यंत पोचत नाहीत. त्यामुळे जमिनीची ओलही लवकर कमी होत नाही. त्यामुळे जळू (कानीट) चे प्रमाण जास्त असते. हा कीटक पायाला लागल्यावर रक्त पितो व पडून जातो; परंतु काही प्रमाणात हे कीटक विषारीही असू शकतात. जास्त प्रमाणावर रक्तस्राव झाल्यास जिवास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वासोट्याला जाताना काळजी घेणे गरजेचे आहे, तसेच जळू लागल्यास मिठाचे पाणी, तंबाखू ओली करून त्यावर लावल्यास ती पडून जाते.
या ठिकाणाहून वासोट्याला जाता येणार
केदारेश्वर बोट क्लब, मुनावळे
भैरवनाथ बोट क्लब, बामणोली
ब्रविमश्वर बोट क्लब, शेंबडी
शिवसागर बोट क्लब, तापोळा
मौजे अंबवडे ता. जावली
तब्बल ४०० बोटींचा ताफा सज्ज
असे आहे वासोटा पर्यटन प्रवेश शुल्क
१०० रुपये प्रती व्यक्ती
१२ वर्षांच्या आत ५० रु.
गाईड २५० रुपये
बोट/वाहन शुल्क १५० रुपये
कॅमेरा शुल्क डीएसएलआर लेन्स कॅमेरा दर १०० रुपये,
साधा कॅमेरा, पॉईंट शूट कॅमेरा ५० रुपये