सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात लम्पी स्कीन बाधित जनावरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या रोगाचा चांगलाच प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढला असून लम्पी स्कीनने आतापर्यंत ३० जनावरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये खिल्लार गाई १२, संकरित गाय १० व देशी ८ गाईचा समावेश आहे.
सातारा जिल्ह्यात पशूसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यात वाढत असलेल्या लम्पी स्कीनबाबत जनावरांची तपासणी मोहीम राबविली जात आहे. बाधित जनावरांवर तत्काळ उपचार करण्यात येत असून, लागण झालेल्या जनावरांच्या ठिकाणापासून ५ किलोमीटर परिसरातील जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे.मात्र, लंपीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पशुपालकांची काळाजी वाढली आहे.
सातारा जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३८३ जनावरे बाधित झाली असून १८६ जनावरे उपचारादरम्यान बरी झालेली आहेत. ३० जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ३ लाख ४९ हजार ३६५ जनावरांचे लसीकरण करण्यात आले असून, त्याची टक्केवारी सुमारे ९८ टक्के आहे.