कराड प्रतिनिधी । कराड शहरात पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा होण्यासाठी अनेक सामाजिक संस्था आणि कराड नगरपालिका पुढाकार घेत असते. कराड येथील पालिका व एन्व्हायरो फ्रेंड्स नेचर क्लब यांच्या वतीने गेल्या १५ वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रयत्न करीत आलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मूर्ती विसर्जनासाठी कराड शहरात प्रत्येक वर्षी २२ वर ठिकाणी कृत्रिम जलकुंभउभारले जातात. या जलकुंभात विसर्जित केलेल्या गणेशमूर्तीची माती पुन्हा शहरातील मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांना दिली जाते. गेल्या वर्षी विसर्जित झालेल्या गणेश मूर्तीमधील तब्बल ३ टनहून अधिक माती जमा झाली असून त्याचा यंदा ही पुनर्वापर केला जाणार आहे.
यंदा देखीलही कुंभार समाजातील तसेच माती संबंधित कारागिरांना माती देऊन या उपक्रमात सातत्य ठेवण्यात येणार आहे. एन्व्हायरो नेचर क्लब व पालिका यांच्या माध्यमातून गणेश मूर्ती विसर्जनासाठी प्रत्येक वर्षी कराड शहरात कृत्रिम जलकुंभाची व्यवस्था केली जाते. त्यात प्लास्टर ऑफ पॅरिस व शाडूच्या मूर्तीचे विसर्जन नागरिक व मंडळाकडून केले जाते.
तर पालिकेमार्फत त्याचे पुन्हा प्लास्टर ऑफ पॅरिस व शाडू अशा वेगवेगळ्या शेततळ्यामध्ये विसर्जन केले जाते. शाडूच्या मातीचे विसर्जन केलेल्या शेततळ्यातील माती ३ महिन्यांनंतर वेगळी काढली जाते. त्या मातीचा पुनर्वापर करण्यासाठी पुन्हा तीच माती नगरपालिकेच्या व क्लबच्या वतीने दिली जाते म्हणजेच या मातीचा पुनर्वापर केला जातो.
पर्यावरणपूरक उपक्रमासाठी कराडकरांचा भरघोस प्रतिसाद : प्रा. जालिंदर काशीद
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही कराड शहरात पर्यावरणपूरक उपक्रम राबवत असून त्या माध्यमातून गणेशोत्सव काळात कृत्रिम जलकुंभ उभारत त्यामध्ये गणेशमूर्ती विसर्जित करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करीत आहोत. नदी प्रदूषण होऊ नये यासाठी आमच्याकडून मोठ्या पर्मनंट जनजागृती देखील केली जाते. आमच्या या उपक्रमाला चांगले यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया कराड एन्व्हायरो फ्रेंड्स नेचर क्लबचे अध्यक्ष प्रा. जालिंदर काशीद यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली आहे.