कराड प्रतिनिधी । ईएसपी बॉयलरचा टेस्टींग करताना स्फोट झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास कराड तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यात घडली. या दुर्घटनेत गंभीररित्या भाजल्याने तीन ते चार कर्मचारी जखमी झाले आहेत. कारखानास्थळावर पोलिसांसह आपत्कालीन यंत्रणा दाखल झाली आहे.
शैलेश भारती (वय 32 रा. उत्तर प्रदेश), अमित कुमार (वय 19 रा. बिहार), धर्मपाल (वय 19 रा.उत्तर प्रदेश) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत घटनस्थाळावरून मिळालेली माहिती अशी की, यशवंतनगर येथे सह्यादि सहकारी साखर कारखान्यात मागील पंधरा दिवसांपूर्वी ईएसपी बॉयलर बसविण्यात आला होता आणि त्याची टेस्टींग आठ दिवसांपासून सुरू होती.
आज गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास टेस्टींग सुरु करण्याचे काम हाती घेण्यात आले. टेस्टिंग सुरु असतानाच येथील बॉयलरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने परिसरातील इतर कामगार देखील भयभीत झाले. कामगारांनी तत्काळ स्फोट झालेल्या ठिकाणी धाव घेतली. यावेळी टेस्टींगचे काम करणारे तीन ते चार कर्मचारी गंभीररित्या जखमी झाल्याची त्यांनी पाहिले. त्यानंतर इतर कामगारांनी जखमी कामगारांना तत्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविले आहे.