सातारा प्रतिनिधी | सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, मद्यपान करण्यास बंदी घालण्यात आल्यामुळे काहीजण चोरीछुपे मद्यपान करतात. मात्र, मद्यपान करण्यासाठी देखील शासनाकडून परवाना दिला जातोय. दारू दुकानांत मद्य विकत घेणाऱ्यांची रिघ लागलेली असते. पण, कायद्यानुसार ‘लिमिटमध्ये’ दारू पिण्याचा परवाना घेणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. उत्पादन शुल्क विभागाकडूनमद्यपानासाठी परवाना दिला जातो. गेल्या पाच वर्षांत सातारा जिल्ह्यात ३ हजार ३९६ जणांनी मद्य पिण्याचा कायदेशीर परवाना घेतला आहे.
दारूपिण्यासाठी संबंधित विभागाकडून दोन प्रकारचा परवाना दिला जातो. वर्षभर दारू पिण्याचा आणि एक दिवसाचा परवाना काढण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्रात दारू पिण्यासाठी पात्र वयोमर्यादा २५ वर्षे ठेवली आहे. असे असले तरी २५ वर्षांवरील व्यक्तींना वैद्यकीय सर्टिफिकेटच्या आधारे परवाना दिला जातो. एका व्यक्तीस दारू पिण्याचा परवाना हवा असल्यास डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असते. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तो पात्र आहे का, याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
महा परवानाधारकांना खरेदी-विक्री करताना काही सवलती मिळतात. खरेदी करणाऱ्यांच्या १० टक्के लोकांकडे परवाना असतो. जवळपास २० टक्के लोक विनापरवानाच मद्य घेतात. परवाना मिळाल्यानंतर त्या व्यक्तीने सामाजिक ठिकाणी मद्यपान करणे टाळावे लागते. तसेच परवाना स्वतःकडे आणि तपासणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे सादर करणे आवश्यक आहे.
100 रुपयांत वर्षभर दारू पिण्याचा परवाना
महाराष्ट्रात दारू पिण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना घ्यावा लागतो. एक दिवसासाठी ५ रुपये, वर्षासाठी १०० रुपये, तर आजीवन परवाना एक हजार रुपयांमध्ये मिळतो. परवाना नसल्यास दारूबंदी कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. पहिल्या गुन्ह्यासाठी दंडात्मक आणि दुसऱ्यासाठी शिक्षा होऊ शकते.
कोणाकडून दिला जातो मद्य परवाना?
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://exciseservices.mahaonli ne.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येतो. यामध्ये आधार कार्ड, फोटो, वैद्यकीय प्रमाणपत्र यासह नोंदणी करावी लागते. यामध्ये परवाना मिळण्यासाठी शासन दराने शुल्क भरावे लागते. परवाना मिळाल्यानंतर दिलेल्या अटींचे पालन करणे बंधनकारक असते.