सातारा प्रतिनिधी । मानधना ऐवजी वेतन द्यावे, मासिक पेन्शन मिळावी यासह असंख्य मागण्यांसाठी सातारा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी आज बुधवारी आक्रमक पावित्रा घेतला. सातारा जिल्ह्यातील ३ हजार २९३ अंगणवाड्यांना टाळा लागला. तर ६ हजार १२५ सेविका आणि मदतनीस बंदमध्ये सहभाग घेतला.
सेविका आणि मदतनीसांनी विविध मागण्यांसाठी ५२ दिवस अंगणवाड्या बंद ठेवून गेल्या नऊ महिन्यांपूर्वी मोठे आंदोलन केले होते. त्यावेळी राज्य शासनाने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देत अंगणवाड्या सुरु करण्यास लावल्या. त्यामुळे अंगणवाडी संघटनांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, त्यानंतरही शासनाकडून मागण्यांबाबत काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे अंगणवाडी संघटनांनी पुन्हा मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. सातारा जिल्ह्यातील अंगणवाडी संघटनेनेही आंदोलन केले.
साताऱ्यात पाच दिवसांपूर्वी सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिक सेविका संघाच्यावतीने जेल भरो आंदोलन देखील झाले होते. त्यानंतर आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या ठरावानुसार शासनाचा निषेध करण्यासाठी २५ सप्टेंबरला मंबईतील आझाद मैदानात महाआंदोलन करण्यात येणार होते. यासाठी सातारा जिल्ह्यातील सेविका आणि मदतनीसही सहभागी झाल्या.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अंगणवाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. सातारा जिल्ह्यात एकूण ४ हजार ५६२ अंगणवाड्या आहेत. त्यातील ३ हजार २९३ अंगणवाड्या बंद होत्या. माण, फलटण, जावळी महाबळेश्वर या तालुक्यात या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला.
जिल्ह्यात ‘या’ तालुक्यातील ‘इतक्या’ अंगणवाड्या बंद
सातारा जिल्ह्यातील एकूण ४ हजार ५६२ अंगणवाड्या पैकी ३ हजार २९३ अंगणवाड्या आज बंद होत्या. त्यामध्ये पाटणमधील ५९१, कराडमधील २२३ साताऱ्यातील ३०३, जावळीतील २७६, महाबळेश्वरमधील १४३, खंडाळातील १८१, फलटणमधील ४७३, माणमधील ३९८, खटावमधील ४३२ आणि कोरेगाव तालुकयातील २५२ अंगणवाड्या आज बंद ठेवण्यात आल्या होत्या.