सातारा प्रतिनिधी । सर्वांनी नववर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. मात्र, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सातारा शहरात विविध संघटनांनी जिल्हा प्रशासनाकडे वेगवेगळ्या मागण्यांसाठी जोरदार आंदोलन केले. विविध संघटनांच्या आंदोलनामुळे सातारकरांचा सोनवणे हा आंदोलनवार ठरला.
रेशनींगच्या पॉज मशीनसह वेगवेगळ्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सातारा जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी येथील तहसीलदार कार्यालयावर बेमुदत संप सुरू केला. फलटण येथे नियमबाह्य भूसंपादन झाल्याच्या निषेधार्थ शंकरराव गोडसे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेने प्रशासनाला निवेदन सादर केले तर अपशिंगे सातारा येथील मुस्लीम समाजाची दफनभूमी अन्यत्र स्थलांतरित करण्याची मागणी येथील मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली. तिन्ही संघटनांच्या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चांगलेच तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सातारा तहसीलदार कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाचे निश्चित लक्ष वेधले . सातारा जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांनी येथील तहसीलदार कार्यालयावर एकत्र येऊन सातारा जिल्हाध्यक्ष श्रीकांत शेटे, कार्याध्यक्ष बबनराव देवरे, सचिव प्रमोद तपासे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. तहसीलदार ऑफिसच्या कार्यालयासमोर त्यांनी ठिय्या दिला सातारा तहसीलदार राजेश जाधव यांना मागण्यांची निवेदन सादर करण्यात आले. हा संप बेमुदत पुकारण्यात आला.
शेतकरी संघटनेने दिला अर्धनग्न आंदोलनाचा इशारा
फलटण तालुक्यात बांधकाम विभाग आणि भुमिअभिलेख कार्यालय यांच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीचे भूसंपादन झाले आहे . त्याचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. यासंदर्भात शेतकरी संघटनेने अर्ध नग्न मोर्चाचे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. जिल्हा प्रशासनाने याबाबत यंत्रणांना योग्य मार्गदर्शन करून योग्य कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र, त्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष शंकरराव गोडसे यांच्या नेतृत्वाखाली जितेंद्र डुडी यांना निवेदन सादर करण्यात आले या संदर्भात कामात हलगर्जीपणा करणारे बांधकाम विभागाचे आणि भुमिअभिलेख कार्यालयाचे कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात यावी अन्यथा पुन्हा शेतकरी संघटना अर्ध नग्न आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला.
दफनभूमी- लोकवस्ती प्रश्नि मुस्लिम संघटना आक्रमक
अपशिंगे तालुका सातारा येथील मुस्लिम समाजाची दफनभूमी लोकवस्तीमध्ये आहे बुधवार दिनांक २७ डिसेंबर रोजी या जागेची मोजणी करून येथे कंपाउंड झाल्याने शेजारी राहणाऱ्या मराठा समाजातील कुटुंबा ना रस्त्याची अडचण आली आहे . सदर मोजणीची नोटीस एक दोन हिस्सेदारांव्यतिरिक्त कोणालाही देण्यात आलेले नाही . मोजणी लगतच्या कोणत्याही हिस्सेदारांची मंजूरी नसतानाही मुस्लिम समाजाने तार कंपाऊंड करण्याचे काम सुरू केले आहे आणि भविष्यात त्या ठिकाणी वॉल कंपाऊंड बांधण्याचा मानस संबंधितांनी बोलून दाखवला आहे या दफनभूमीमुळे वहिवाटीची आणि येण्या-जाण्याची अडचण होत आहे तरी मुस्लिम समाजाची दफनभूमी इतरत्र स्थलांतरित करावी अन्यथा दोन्ही समाजामध्ये जातीय वाद होण्याची शक्यता आहे, असे निवेदन अपशिंगे येथील सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलेले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे रेशनींग दुकानदारांना आश्वासन
ऑल इंडिया फेयर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशन नवी दिल्ली या देशव्यापी संघटनेची रेशन दुकानदार संघटनेची संलग्न असणारी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य व केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे यांच्या आदेशानुसार या संपाचे आयोजन करण्यात आले होते. रेशन दुकानदारांना अल्प स्वरूपाचे मिळणारे वेतन, पॉज मशीन च्या तांत्रिक अडचणी तसेच रेशन दुकानदारांच्या माध्यमातून कमी धान्य पुरवठा झाल्यास होणारे वादावादीचे प्रसंग याविषयी सातारा जिल्हा केरोसीन आणि रेशन धान्य दुकानदारांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रारींची नोंद केली होती. मात्र अद्यापही या विषयांवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही या निषेधार्थ सातारा शहरातील 180 तर जिल्ह्यातील सुमारे 750 रेशनधारकांनी बेमुदत संप पुकारलेला आहे. या संपाची दखल खुद्द जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी घेतली. या संदर्भात लवकरच व्यापक बैठक आयोजित करून या प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी शिष्ट मंडळाला दिले.