कराडच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून 3 अल्पवयीन मुले ताब्यात; दीड लाख रूपये किमतीच्या 3 दुचाकी हस्तगत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड तालुका गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दहा दिवसांपूर्वी चोरलेल्या तीन दुचाकी चोरट्यास अटक करण्यात यश आले आहे. पथकाने तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कराड तालुका पोलीस ठाणे हद्दीत गेल्या अनेक दिवसापासून दुचाकीच्या चोरीच्या घटना घडत होते. संबंधित चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हे अन्वेषण शाखेचे नितीन येळवे, सज्जन जगताप, सचिन निकम, उत्तम कोळी, प्रफुल्ल गाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप कांबळे यांना गोपनीय माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, विंग ता. कराड येथे सापळा लावला असता एका प्लेजर दुचाकीवरून तीन अल्पवयीन मुले संशयितरित्या जात असताना दिसली. त्यांना ताब्यात घेऊन आणखी विचारपूस केली असता त्यांच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी ती दुचाकी तांबवे येथून आठ दिवसापूर्वी चोरी केल्याचे कबूल केले. तसेच त्यांनी कोळे येथील बैलगाडी शर्यतीमधील पार्किंगमधून एक बजाज मोटारसायकल व मलकापूर नगरपालिका जवळून एच. एफ. डिलक्सही चोरी केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी त्यांच्याकडील 1 लाख 55 हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमलदार नितीन येळवे, सज्जन जगताप, सचिन निकम, उत्तम कोळी, प्रफुल्ल गाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप कांबळे यांनी केली.