साताऱ्यातील कंपनीच्या आवारात आढळले बिबट्याचे 3 बछडे, एक निघाला ब्लॅक पँथर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा तालुक्यातील एका कंपनीच्या आवारात रविवारी सकाळी बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. त्यात एक काळा रंगाचा बछडा होता. त्यामुळे ब्लॅक पॅंथरचा बछडा आढळून आल्याची वार्ता सर्वत्र पसरली. या बछड्यांची वनविभागाने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत वैद्यकीय तपासणी केली. नंतर त्यांची मादी बिबट्याबरोबर भेट घडवून आणली.

साताऱ्यात आढळून आलेल्या बिबट्याच्या बछड्यांमध्ये एक बछडा पूर्णता काळ्या रंगाचा होता. त्यामुळे ब्लॅक पॅंथर चा बछडा आढळून आल्याची वार्ता सर्वत्र पसरली होती. मात्र, काळा बिबट्या ही वेगळी जात नसून हा बछडा मांर्जार कुळातीलच असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. पिवळ्या कातडीवर काळे ठिपके असा बिबट्या असतो. बछड्याच्या कातडीचा रंग त्वचेतील “मेलनिन’ या रंगद्रव्यावर अवलंबून असतो.

या द्रव्याचे प्रमाण जास्त झाल्यास, कातडी काळी किंवा गडद रंगाची होते. काळ्या बिबट्याच्या बाबतीत हेच होते. त्याच्या शरिरात “मेलनिन’चे प्रमाण जास्त असल्यामुळे तो काळा किंवा गडद रंगाचा होतो. त्याच्या शरिरारवर नेहमीच्या बिबट्याप्रमाणे काळे ठिपके असतात, पण गडद रंगामुळे ते अगदी जवळ गेल्याशिवाय दिसू शकत नाहीत, असा खुलासा वन्यजीव अभ्यासकांनी केला आहे.

मादी बिबट्याच्या गर्भधारणे वेळी जनुकीय बदल झाल्यास एखाद्या पिल्लाच्या कातडीच्या रंगबदलामुळे प्राण्याच्या वर्तणुकीत किंवा स्वभावात काही फरक पडत नाही. ते त्यांच्या कुळातील प्राण्यांप्रमाणेच वागतात. काळा बिबट्या ही वेगळी जात नसल्यामुळे त्याच्या सवयी नेहमीच्या बिबट्यांप्रमाणेच असतात. बिबट्याच्या मादीला होणाऱ्या पिलांपैकी एखादे काळ्या रंगाचे असू शकते. वयाच्या दीड वर्षापर्यंत पिल्ले स्वतंत्र शिकार करू लागतात. बाकी सर्व सवयी बिबट्याच्याच आणि खाद्यही तेच असल्यामुळे रंग वगळता काळा बिबट्या आणि नेहमीचा बिबट्या यांच्यात काहीही फरक नाही, मात्र अशा रंगाचा प्राणी दुर्मिळ असल्यामुळे त्याचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे, अशी माहिती देखील वन अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, साताऱ्यातील कंपनीच्या आवारात आढळून आलेल्या बिबट्याच्या बछड्यांचे उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज,सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजूर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण, वनरक्षक राज मोसलगी, सुहास काकडे,, सातारा रेसक्यू टीमचे ओंकार ढाले,पवन शिरतोड, पुणे रेसक्यू टीमचे नरेश चांडक, सिध्दी पंचमी, डॉ. पूर्वा निमकर यांनी मादीशी पुनर्मिलन घडवून आणले.