कराड प्रतिनिधी । सनई चौघड्याचा आवाज, सर्वत्र पाहुण्यांचा गोंधळ, एकमेकांच्या सोबत बोलण्यात, भेटीगाठी घेण्यात दंग असलेल्या लग्नसोहळ्यात अज्ञात चोरट्याने अगदी जेवणाचा आस्वाद घेऊन तब्बल 3 लाख 14 हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना सातारा तालुक्यातील वर्ये या ठिकाणी शुक्रवार, दि. 23 रोजी घडली. याप्रकरणी अज्ञातावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा तालुक्यातील वर्ये येथील एका मंगल कार्यालयात दि. 23 रोजी लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला वधू-वर या दोन्ही बाजूंकडील वऱ्हाडी मंडळींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. सुरुवातीला श्रीमंत पूजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर हळदी लागल्या. आणि लग्नही झाले. लग्नसोहळा धूमधडाक्यात पार पडत असताना कुणालाही कल्पना नव्हती कि पुढे भयानक अशी गोष्ट घडणार आहे. वधू-वराने एकमेकांना वरमाला घातल्यानंतर वधूकडील नातेवाईक वधूच्या खोलीत गेले असता त्या ठिकाणी दागिने गायब झाल्याचे नातेवाइकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर मंगल कार्यालयात एकच गोंधळ उडाला. अज्ञात चोरट्यांनी दागिने असलेली पिशवीच हातोहात लांबविली.
वधूच्या खोलीत ठेवण्यात आलेल्या पिशवीमध्ये साडेसात ग्रॅम वजनाचे कानातील टाॅप्स, दीड तोळ्याचे मणिमंगळसूत्र, अडीच तोळ्यांचे 4 सोन्याचे क्वाइन, चांदीची मूर्ती, चांदीचे पैंजण एकूण 5 जोड, 50 हजारांची रोकड तसेच 50 हजार रुपयांची आहेराची पाकिटे असा सुमारे 3 लाख 14 हजारांचा ऐवज होता. या घटनेनंतर नातेवाइकांनी मंगल कार्यालयात चोरट्याचा शोध घेतला. मात्र, चोरटा सापडला नाही. याबाबत मीना शिंदे (रा. कोडोली, सातारा) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेचा हवालदार कुमठेकर हे अधिक तपास करीत आहेत.