सातारा प्रतिनिधी | पावसाने ओढ दिल्यामुळे या वर्षीची पाणी टंचाई जिल्ह्याच्या पूर्व भागाबरोबरच पश्चिम भागालाही जाणवत आहे. कराड, पाटण तालुक्यातही काही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. कराड तालुक्यात 4, तर पाटण तालुक्यातही 9 आणि वाई तालुक्यात 4 टँकर सुरू आहेत. याशिवाय अनेक गावांतून टँकरची मागणी नसली तरी त्या ठिकाणी पाण्याचा ठणठणाट आहे. संपूर्ण जिल्ह्यात 431 टँकर सुरू आहेत.
सातारा जिल्ह्यात जून 2023 मध्ये सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये अत्यंत कमी पाणीसाठा झाला. पावसाळा संपताच पूर्वेकडील भागात पाणीटंचाई भासू लागली. पश्चिमेकडील भागातही पूर्ण क्षमतेने पाऊस झाला नाही. त्यामुळे जानेवारी, डिसेंबरपासून पाणीटंचाईची चाहूल लागली. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील 207 गावे आणि 653 वाड्या-वस्त्यांमधील 3 लाख 22 हजार 881 लोकसंख्या दुष्काळामुळे बाधित झाली आहे. यामध्ये पश्चिमेकडील वाई तालुक्यातील चार गावांतील 3014 गावे बाधित आहेत. मांढरदेव, गुंडेवाडी, ओहळी, बालेघर गावांचा समावेश आहे. टंचाईग्रस्त चार गावांत टँकर सुरू आहे. पाटण तालुक्यातील 7 गावांतील 4443 लोकसंख्या बाधित आहेत, तर 9 टँकर सुरू आहेत.
65 विहिरी, 50 विंधन विहिरी अधिग्रहित
यावर्षी जिल्ह्यातील तब्बल २,०६,८४५ पशुधन दुष्काळामुळे बाधित झाले आहे. यामध्ये सर्वाधिक पशुधन १ लाख १९ हजार ७१५ माण तालुक्यातील आहे. यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत जनावरांच्या चारा आणि पाण्याची व्यवस्था कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन व्हावे, यासाठी जिल्ह्यातील ६५ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे ५० विंधन विहिरीही अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.