सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील मेणवली, ता. वाई येथील एका हॉटेल व्यवसायिकाला तब्बल 10 लाख रुपयाच्या खंडणीची मागणी करून दरोडा टाकल्या प्रकरणी पोलिसांनी कळंबा कारागृहातून 3 मुख्य आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
कुविख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव, (रा. भुईंज, ता. वाई) निखिल व अभिजीत शिवाजी मोरे (रा. गंगापुरी, ता.वाई) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मेणवली ता. वाई येथील चंद्रकांत नवघणे या हॉटेल व्यवसायिकाला दहा लाख रुपये खंडणीची मागणी केली. त्याकरिता कळंबा कारागृहातून मुख्य प्रमुख संशयतांनी नवघणे फिर्यादीच्या फोनवर फोन करून वारंवार धमक्या दिल्या. दि १ जून २०२३ रोजी हॉटेल माधवन इंटरनॅशनल मेणवली या ठिकाणी १२ साथीदारांना पाठविले व त्याला पिस्टलचा धाक दाखवून शिवीगाळ व मारहाण केली.तसेच दीड तोळ्याची सोन्याची चैन दरोडा टाकून चोरून नेली.
याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात खंडणी व दरोडाचा १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी १२ संशयित आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार संशयित आरोपी हे मोक्का अंतर्गत कळंबा कारागृहात होते. त्यांना न्यायालयाच्या परवानगीने कारागृहातून शनिवारी ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले.
यावेळी तपास अधिकारी पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सरकारी अभियोगता अर्चना देशमुख यांनी या संस्थेने कारागृहातून साथीदारांना फोन केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यासाठी कोणत्या मोबाईलचा, सिमकार्डचा वापर केला याबाबतची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली त्यावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती सी. व्ही. शिरसाट यांनी दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
ॲड. रवींद्र भोसले व प्रथमेश बनकर यांनी संशयितांची बाजू मांडली. न्यायालय परिसरात बंटी जाधव समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. अधिक तपास परीवेक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे करत आहेत. पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज कृष्णकांत पवार व सहाय्यक उपनिरीक्षक विजय शिर्के व पोलीस कर्मचाऱ्यांनी न्यायालय परिसरातील बंदोबस्त ठेवला होता.