शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन सेंद्रिय शेती करावी : विकास बंडगर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । बोरगाव कृषी विज्ञान केंद्र आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्यावतीने नुकतेच डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत निवड केलेल्या गटप्रमुख, कृषी अधिकारी आणि कर्मचारी यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी “शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट तयार करावे व सेंद्रिय प्रमाणीकरण प्रक्रियेत भाग घ्यावा जेणेकरून उत्पादित शेतमाल व प्रक्रिया युक्त पदार्थ विक्रीतून योग्य मोबदला मिळू शकते. सेंद्रिय खतांचा वापर करावा व सेंद्रिय निविष्ठा बांधवरच तयार करावा,” असे प्रतिपादन आत्मा सातारचे प्रकल्प संचालक विकास बंडगर यांनी केले.

बोरगाव येथील प्रशिक्षण कार्यक्रमास वाई तालुक्यातील नैसर्गिक पद्धतीने शेती करणारे शेतकरी, गटप्रमुख, संबंधित कृषी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पार पडलेल्या प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्रामध्ये उद्यान विद्या शास्त्रज्ञ श्री भूषण यादगीरवार यांनी नैसर्गिक व सेंद्रिय शेती म्हणजे काय? व सोबत शेतीमध्ये कीड व रोग संरक्षणासाठी आणि जिवाणूंची संख्या वाढविण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्यानंतर अजिंक्य घाडगे यांनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेबाबत माहिती दिली.

दुसऱ्या दिवसाच्या सत्रामध्ये सागर सकटे यांनी अझोला निर्मिती व त्याचे फायदे या विषयावर माहिती दिली. कृषीभूष शेतकरी अशोक चिवटे यांनी नैसर्गिक शेती व पाचट व्यवस्थापन या विषयावर माहिती दिली. अमोल भोसले यांनी गांडूळ खत निर्मिती आणि त्याचे महत्त्व या विषयावर मनोगत व्यक्त केले. सेंद्रिय शेती अभ्यासक दादासो घाडगे यांनी ब्रम्हास्त्र व अग्निअस्त्र तयार करण्याबाबत प्रात्यक्षिक करुन दाखविले. प्रदीप देवरे यांनी माती परीक्षण व गट बांधणी या विषयी माहिती दिली. या प्रशिक्षण दरम्यान नैसर्गिक पद्धतीने आपला शेतीमाल कसा पिकवायचा या गोष्टीवर भर देताना यासाठी शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेणे फार महत्त्वाचे आहे, असे मत कार्यक्रम समन्वयक डॉ. महेश बाबर यांनी व्यक्त केले.