नवीन महाबळेश्वरमध्ये आणखी 294 गावांचा समावेश; जिल्ह्यातील ‘या’ 3 तालुक्यातील गावांचा प्रस्ताव सरकारकडे

0
537
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणाच्या शेजारीच कोयना बॅकवॉटरला लागून असलेल्या नवीन महाबळेश्वर गिरिस्थान प्रकल्पात नव्याने २९४ गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने राज्य सरकारकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. मंजुरी मिळाल्यास सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाटण, सातारा, जावळी या तालुक्यांतील ५२९ गावांसाठी MSRDC नियोजन प्राधिकरण म्हणून काम करणार आहे.

सातारा जिल्ह्यातील २३५ गावांतील ११५३ चौ. किमी क्षेत्रफळावर हे गिरिस्थान उभारण्यासाठी प्रारूप विकास आराखडा यापूर्वीच नागरिकांच्या सूचना, हरकतींसाठी एमएसआरडीसीने जाहीर केला आहे. तो लवकरच अंतिम केला जाणार आहे. या २३५ गावांमध्ये रोपवे, घाटमाथा रेल्वे, सायकल ट्र्रॅक, फ्युनिक्यूलर रेल्वे यांच्या विकासासह टुरिस्ट पॅराडाइज, पर्यटन आणि निसर्गसंपदा विकास केंद्र प्रस्तावित केले आहे. त्यातून तेथे पर्यटनाला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

यापूर्वी नवीन महाबळेश्वर गिरिस्थानात समाविष्ट केलेल्या २३५ गावांच्या अधिसूचित क्षेत्रानजीक असलेल्या २९४ गावांचाही या प्रकल्पात नव्याने समावेश करण्यात येणार आहे. या २९४ गावांचे एकूण क्षेत्रफळ ९४४ चौ. किमी आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या २३५ गावांचे एकूण क्षेत्र १,१५,३०० हेक्टर आहे. आता नव्याने समाविष्ट केल्या जाणाऱ्या २९४ गावांचे क्षेत्रफळ ९४,४०४ हेक्टर एवढे आहे. या नव्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास साताऱ्यातील ५२९ गावांतील २,०९,७०० हेक्टर क्षेत्रासाठी एमएसआरडीसी नियोजन प्राधिकरण असणार आहे.

सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावाचा होणार समावेश

सातारा जिल्ह्यातील यवतेश्वर, पाटेघर, रेवळी, परळी, नुणे, रोहोत, सरखाल, भांबावळी, चिंचणी, दरे बुद्रुक, धावडशी, कळंबे, कामठी तर्फे सातारा, कान्हेर, करंजे तर्फे परळी, आंबावडे बु. आगुडेवाडी या गावांचा समावेस होणार आहे.

पाटण तालुक्यातील ‘ही’ गावे समाविष्ट

झाकडे, विहे, करंजवडे, येरफळे, तोरणे, साळवे, सांबूर, शिंदेवाडी, शिरशिंगे, तळीये, तेलेवाडी, नवजा, नाटोशी, निवडे, रोहिने, मारूळ हवेली, मुरूड, म्हावशी, मणेरी, गोकुळ तर्फे हेळवाक, जरेवाडी, काळगाव, डिचोळी, दिवाशी खुर्द, बाणपुरी, चाळकेवाडी.

जावळीतील १६ गावे नवीन महाबळेश्वरात

मालदेव, मेट इंदवली, मोहाट, पाली तर्फे तांब, ताकवली, तांबी, वासोटा, आडोशी, अंबेघर तर्फे मेढा, भणंग, गवडी, जुंगटी, खिरखंडी, कुसापुर, कुसवडे, माडोशी.