सातारा प्रतिनिधी । राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवासी संख्या वाढवण्यासाठी तसेच प्रवाशांना आरामदायी प्रवास घडावा यासाठी प्रयत्न केले जातात. या दृष्टीने महामंडळाच्या ताफ्यात सात ते आठ वर्षांपूर्वी शिवशाही गाड्या दाखल झाल्या होत्या. या गाड्या तुलनेत खूपच नाजूक होत्या. त्यामुळे अधूनमधून कामे काढत असत. तक्रारीही येत होत्या. तक्रारीनंतर सातारा विभागाकडून या गाड्यांची डागडुजी करण्यात आली. त्या गाड्यांची बारामती विभागीय कार्यशाळेतील समितीने नुकतीच तपासणी देखील केली. या तपासणीनंतर जिल्ह्यातील २८ शिवशाही गाड्या प्रवासी वाहतुकीसाठी तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
सातारा जिल्ह्याच्या ताफ्यात शिवशाही गाड्या दाखल झाल्यानंतर प्रवाशांमधून खूपच चांगले स्वागत झाले. थंड आणि गारेगारे प्रवास घडत असल्याने तिकीट दर जास्त असले तरी लोक प्रवास करत होते. मात्र कोरोना काळात गाड्या एकाच जागी उभ्या होत्या. त्यामुळे सर्वाधिक फटका या गाड्यांनाच बसला होता. या गाड्यांच्या बॅटऱ्या डाऊन झाल्याने नुकसानही झाले होते. त्यातूनही याव गाड्या सद्यस्थितीत चांगली प्रवासी सेवा बजावत आहेत.
२८ बसची करण्यात आली तपासणी
सातारा आगारात असलेल्या २८ गाड्यांची तांत्रिक तपासणी बारामती विभागीय कार्यशाळेतील अधिकाऱ्यांच्या समितीने केली. या गाड्यांच्या स्थितीबाबत संबंधित समितीने काही सूचना सुचविल्या असून अहवाल वरिष्ठ कार्यालयाला दिला.
याची केली तपासणी
१) चालक केबीन, २) हॅण्ड रेस्ट, ३) इंजिन बोनेट लॉक, ४) सीट रिक्लायनरचे वर्किंग, ५) गिअर लिव्हर बुट कव्हर, ६) पडसे स्वच्छ किंवा अजीर्ण, ७) पॅसेंजर सलून फ्लोरिंग, ८) एसी ब्लोअर, ९) सीटरचे कुशन, १०) एसी फिल्टर साफ केलेले
बसस्थानकात पेट
सातारा मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या असलेल्या चार शिवशाही गाड्या चार वर्षांपूर्वी अचानक लागलेल्या आगीत भस्मसात झाल्या होत्या. त्यावेळी कुशन अन् पडद्यामुळे हानी लवकर मोठ्या प्रमाणावर झाली होती.
अहवालानंतर होणार शिवशाहीचा फैसला
आताच्या घडीला तरी सातारा जिल्ह्यात असलेल्या शिवशाही गाड्या या सुस्थितीत आहेत. त्या रस्त्यावर धावून प्रवासी सेवा देत आहेत. बारामतीतील अधिकाऱ्यांनी या गाड्यांची तपासणी केली आहे. त्याचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवला जाणार आहे. त्यानंतर या गाड्यांचा निर्णय होणार आहे.
खासगी शिवशाही बंद झाल्याने दिलासा
एसटीच्या ताफ्यात नव्याने शिवशाही दाखल झाल्या यामध्ये खासगी गाड्यांचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे चालकही खासगी होते. त्या काळात दररोज कोठे ना कोठे अपघात घडत असत. त्यामुळे एकेकाळी शिवशाही गाड्या बदनाम झाल्या होत्या.