सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणूक 2024 आचारसंहिता सुरु असून निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पडाव्यात यासाठी सी व्हिजील या मोबाईल ॲपचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ॲड्राईड मोबाईल प्लॅटफॉर्मवर हे ॲप उपलब्ध आहे. मतदानातील गैरप्रकार अथवा आदर्श आचारसहिंतेच्या उल्लंघनाच्या कोणत्याही घटनेच्या तक्रारी नागरिकांना सी व्हिजील ॲपद्वारे थेट निवडणूक आयोगाकडे करता येतात. तक्रारीनंतर 100 मिनिटांत यावर कार्यवाही करण्यात येते. एखाद्या गैरप्रकाराचा फोटो किंवा व्हिडीओ घेऊन आदर्श आचारसहिंतेच्या उल्लंघनाची तक्रार या ॲपद्वारे करता येते.
सातारा जिल्ह्यात या सी व्हिजील ॲपवर आतापर्यंत एकूण 27 विविध प्रकारच्या तक्रारी प्राप्त झालेल्या असून या सर्वांवर विहित मुदतीत आवश्यक कार्यवाही करण्यात आलेली आहे. तसेच नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टल (NGSP) हे विविध प्रकाराच्या तक्रारी एकत्रित करण्यासाठी तयार केलेले पोर्टल आहे. या पोर्टलवर नागरिकांच्या तक्रारींचे सर्वसमावेशक रेकॉर्ड, त्याला दिलेला प्रतिसाद, करण्यात आलेली कार्यवाही या सर्वांची माहिती ठेवण्यात येते.
नागरिक या पोर्टलवर देखील मतदार नोंदणी, मतदान केद्रांची ठिकाणे, इव्हीएम, निवडणूक खर्च, पैशाची अवैध देवाण घेवाण आदीबाबत माहिती देता येते अथवा तक्रार करता येते. जिल्ह्यात या पोर्टलवर आचारसहिंता कालावधीत आतार्पंत विविध प्रकारच्या एकूण 74 तक्रारी तर, 52 लोकांनी माहिती विचारण्यासाठी वोटर हेल्पलाईनवर फोन केले व त्यावर दिलेल्या माहितीने ते समाधानी झाले.
काय आहे सी व्हिजील ॲप?
1) उमेदवार पैसे, वस्तू वाटप करत असेल तर तक्रार करा.
2) निर्धारित वेळेनंतर प्रचार करत असेल तर तक्रार करा.
3) पैसे वाटप किंवा वेळेनंतर प्रचार केल्यास त्याचा फोटो काढा आणि ॲपवर अपलोड करा.
4) तुमच्या मोबाईल लोकेशनचा वापर करुन तुमचा ठावठिकाणा शोधला जाईल.
5) तक्रार केल्यानंतर 100 मिनिटांत निवडणूक आयोगाचं पथक घटनास्थळी पोहोचेल.
6) तुमच्या तक्रारींचं निवारण करण्यात येईल.
cVIGIl App Guide : सी व्हिजील ॲप कसं काम करतं?
1) युजरला निवडणुकीदरम्यानच्या गैरप्रकाराचा फोटो काढून किंवा दोन मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड करून ॲपवर अपलोड करावा लागेल. यानंतर भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) नकाशावर स्थानाचा शोध घेईल. तक्रार सबमिट केल्यानंतर प्रत्येक रिपोर्टसाठी एक युनिक आयडी मिळेल.
2) तक्रार केल्यानंतर, माहिती जिल्हा नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचते आणि एका फील्ड युनिटला नियुक्त केले जातात, ज्यामध्ये फ्लाइंग स्क्वॉड आणि पाळत ठेवणाऱ्या पथकांचा समावेश आहे. ही पथके लोकेशनवर नेव्हिगेट करण्यासाठी आणि कारवाई करण्यासाठी ‘cVIGIL Investigator’ नावाचं मोबाइल ॲप वापरतात.
3) एकदा फील्ड युनिटने तक्रारीला प्रतिसाद दिल्यानंतर, ते cVIGIL Investigator द्वारे रिटर्निंग ऑफिसरला फील्ड रिपोर्ट पाठवतात. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर ती तक्रार निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय तक्रार पोर्टलवर पाठवली जाते आणि नागरिकांना 100 मिनिटांत परिस्थितीची माहिती दिली जाते आणि त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.