विधानसभेची 26 नोडल अधिकाऱ्यांवर कामाची जबाबदारी; 18 हजार कर्मचाऱ्यांकडून दररोज काम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | प्रत्येक मतदाराला आपला हक्क बजावता यावा, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी प्रशासनाचे १८ हजार कर्मचारी राबत आहेत. अनेक बाबींची पूर्तता करण्यासाठी कर्मचारी रात्रीचा दिवस करत आहे. मतदानाची तारखी येईपर्यंत ही धांदल आणखी वाढत आहे. त्यामुळे मतदारांनीही हे परिश्रम सार्थक होण्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याची गरज आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच निवडणूक विभागाकडून मतदार याद्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करणे, अर्ज छाननी, अर्ज माघार, अंतिम उमेदवार यादी, मतदान यंत्राची तपासणी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, दुर्गम भागात मतदान यंत्रे पोहोचवणे, सर्व आवश्यक साहित्य, पोलिस बंदोबस्त, आचारसंहितेची अंमलबजावणी अशा शेकडो कामांची जंत्री आहे.

प्रत्येक काम काटेकोरपणे पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शखाली उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, निवडणूक विभाग, सर्व विधानसभांचे निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व २६ नोडल अधिकारी तसेच अधिकारी आणि सुमारे १८ हजार अधिकारी कर्मचारी राबत आहेत.

एकूण 12660 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी मतदान, तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात एकूण ३१६५ मतदान केंद्रे असून, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण ३१६५ मतदान केंद्राध्यक्ष, ३१६५ मतदान अधिकारी, ६३३० इतर मतदान अधिकारी अशा एकूण १२६६० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षणदेखील पूर्ण झालेले आहे. याशिवाय सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलिस जवानांचाही बंदोबस्त राहणार आहे. एकीकडे प्रचाराचा धुरळा उडत असताना प्रशासन मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी कामाला लागले आहे.

असे आहेत 26 नोडल अधिकारी

आचारसंहिता अंमलबजावणीसाठी अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय मतदान व स्वीप मॅनेजमेंट, कायदा सुव्यवस्था, मनुष्यबळ व्यवस्थापन, ईव्हीएम व्यवस्थापन, मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य पुरवठा, वाहनांची उपलब्धता, वाहतूक व जीपीएस, पोस्टल बॅलट पेपर, बैलेट पेपर ईटीपीबीएस व डमी बॅलेट, एएमएफ, मतदार यादी व्यवस्थापन, सिक्युरिटी प्लॅन, डैशबोर्ड, विविध अहवाल पाठवणे, निरीक्षकाशी संपर्क, माध्यम संपर्क, वोटर हेल्पलाईन तक्रारी, अवैध रक्कम जप्त करणे, कर्मचारी प्रशिक्षण व्यवस्थापन, सायबर सेक्युरिटी, दिव्यांग मतदार, पोलिस प्रशासन, अवैध दारू कारवाई, सूक्ष्म निरीक्षक, वेब कास्टिंग, एक खिडकी पद्धत, डीएईएमपी सुरक्षा कक्ष व्यवस्था, एसएमएस मॉनिटरिंग व कम्युनिकेशन अशा विविध कामासाठी नोडल अधिकाऱ्याऱ्यांची नेमणूक केली आहे.