सातारा प्रतिनिधी | कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांना केवळ मूळ थकबाकीची रक्कम भरून थकबाकीमुक्ती आणि वीज जोडणीची संधी महावितरणने उपलब्ध केली आहे. मात्र, या अभय योजनेचा प्रसार व प्रचार न झाल्याने सातारा जिल्ह्यातील केवळ 251 ग्राहकांनी लाभ घेतलेला आहे.
वीज बिलाच्या थकबाकीमुळे दि. 31 मार्चपर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या वीज ग्राहकांसाठी महावितरणने अभय योजना सुरू केली आहे. एक सप्टेंबर ते दि. 30 नोव्हेंबर असा या योजनेचा कालावधी आहे. कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वीज ग्राहकांसाठी ही योजना आहे.
मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास त्यात लघुदाब ग्राहकांना आणखी दहा टक्के तर उच्च दाब ग्राहकांना पाच टक्के सवलत मिळत आहे. किंवा मूळ थकबाकीची रक्कम सुरुवातीला 30 टक्के भरल्यास 70 टक्के रक्कम सहा हप्त्यांमध्ये भरण्याची व्यवस्था आहे.
मात्र, सातारा जिल्ह्यामध्ये या योजनेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. ही योजना वीज वितरणच्या संकेत स्थळावर जाहीर होऊनही जिल्ह्यात अभय योजनेचा अभय प्रतिसाद मर्यादित आहे. जिल्हयातीत सतर्क अशा 251 वीज खातेदारांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यातून 2788, सोलापूरमध्ये 879, कोल्हापूरमध्ये 321, सांगली जिल्ह्यामध्ये 1299 खातेदारांनी थकबाकी मुक्तीचा फायदा घेतला आहे.