सातारा प्रतिनिधी । राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील वर्ग ३ आणि ४ मधील कर्मचारी पुन्हा १४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातीलही २५ हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी होणार आहेत. या कारणाने शासकीय कामकाज ठप्प होणार असून याचा फटका सर्वांनाच बसणार आहे.
जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना लागू करावी ही मागणी अनेक वर्षांपासून आहे. तरीही शासनाकडून डोळेझाक होत आहे. यासाठी आता १४ डिसेंबरपासून राज्यभरात बेमुदत संप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांही करण्यात आलेल्या आहेत.
राज्यात हा संप सुरू होणार असून सातारा जिल्ह्यातीलही शासकीय, निमशासकीय कार्यालयातील वर्ग ३ आणि ४ चे कर्मचारी सहभागी होणार आहेत. तसेच शिक्षकांचाही या संपात समावेश असणार आहे. सुमारे २५ हजरांहून अधिक कर्मचारी सहभागी होणार आहेत. यामुळे यंत्रणा ठप्प होणार आहे. याचा परिणाम कार्यालयातील कामकाजावर होणार आहे.
‘या’ आहेत महत्वाच्या मागण्या
ज्या मागण्यांसाठी बेमुदत संप केला जाणार आहेत त्या महत्वाच्या मागण्या आहेत. त्यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणे, रिक्त पदे भरली जावीत, विनाअट अनुकंपा नियुक्ती करणे, कंत्राटीकरण धोरणाचे उच्चाटीकरण करणे, चतुऱ्थश्रेणी कर्मचारी आणि वाहनचालक पद भरतीवरील बंदी उठविणे. शिक्षण क्षेत्रातील दत्तक योजना, समुह शाळा योजनांद्वारे शाळांचे होणारे कार्पोरेट धार्जिणे खासगीकरण धोरण रद्द करणे, नवीन शिक्षण धाेरणाचा पुनर्विचार करणे, पाचव्या वेतन आयोगापासून वेतनत्रुटी दूर करण्यासाठी यंत्रणा स्थापित करणे, सेवानिवृत्तीचे वय ६० करावे आदी मागण्यांसाठी हा संप करण्यात येत आहे.