मटणाच्या जेवणावर मारला ताव नंतर तब्बल 23 जणांना झाली विषबाधा; एकाचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । यात्रेच्या मटणाच जेवण असलं की आधी हाताच्या भाहया मागे सारायच्या मग तांबडा, पांढरा रस्सा पित मटणावर ताव मारायचा, असं चित्र यात्रेतील घराघरात बघायला मिळत. मात्र, हेच मटणाचं जेवण जीवानिशी बेतेल असं वाटलं नव्हतं. कारण मटणाच्या जेवणातून एक नाही दोन नाही तर तब्बल 23 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका जणाचा जीवही गेला आहे. या घटनेमुळे कराड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

कराड तालुक्यातील वहागाव येथे मांसाहारी जेवणातून 23 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विषबाधा झालेल्यांपैकी तुकाराम विठ्ठल राऊत (रा. वहागाव, ता. कराड) यांच्यावर उपचार सुरू असतानाच रविवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी सुनंदा तुकाराम राऊत व सचिन वसंत सोनुलकर यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वहागाव येथील तुकाराम विठ्ठल राऊत यांच्या नातेवाईकाची शुक्रवार, दि. 2 जून रोजी देवाची यात्रा होती. यात्रेत मासांहारी जेवण ठेवण्यात आले होते. यात्रेमुळे तुकाराम यांच्या पाहुण्यांनी त्यांच्यासह येतगाव (ता. कडेगाव), गोळेश्वर, अभयनगर, विंग तसेच स्थानिक वहागाव मधील 35 पाहुणे व नातेवाईकांना जेवणासाठी निमंत्रित केले होते. शुक्रवारी यात्रेत चांगल्या प्रकारे जेवण झाले. अनेकजण पोट भरून जेवले. मांसाहारी जेवण झाल्यानंतर पाहुण्यांचा निरोप घेऊन आपापल्या घरी परतले. शनिवारी उजाडताच एकेकाला हळू हळू त्रास होऊ लागला. कुणाला जुलाब तर कुणाला उलट्या होऊ लागल्या. आदल्या दिवशी जेवलेल्या 35 जणांपैकी तुकाराम राऊत यांच्या कुटुंबीयांसह 23 जणांना उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला. विषबाधा झालेल्या 23 जणांमध्ये वहागावमधील 11, येतगाव 4, गोळेश्वर 2, अभयनगर 3 व विंग येथील 3 जणांचा समावेश आहे.

उलट्या व जुलाबाचे प्रमाण वाढल्यामुळे तुकाराम राऊत, पत्नी सुनंदा तुकाराम राऊत आणि सचिन वसंत सोनुलकर यांना कराड येथे खासगी रुग्णालयात उपचार करता दाखल करण्यात आले होते. तसेच वहागाव येथील वसंत अण्णा सोनुलकर, गणेश बाळासाहेब पवार, मनोहर जयवंत पवार, भामा वसंत सोनवलकर, लक्ष्मण ज्ञानदेव राऊत, अनिकेत लक्ष्मण राऊत, अण्णा लक्ष्मण सरगर, लक्ष्मण विष्णू सरगर व जयेश सदाशिव पवार यांना वहागाव आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात उपचाराकरता दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, तुकाराम राऊत यांच्यावर कराड येथे उपचार सुरू असतानाच रविवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. पत्नी सुनंदा तुकाराम राऊत व सचिन वसंत सोनुलकर यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील चव्हाण, कराड गटविकास अधिकारी मीनाताई साळुंखे, उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्नेहल कदम, वहागाव उपकेंद्राचे डॉ. गंगाधर माने यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत विषबाधा झालेल्यांवर उपचार सुरू केले. संबंधित घरातील 5 लोकांचे स्टुल सॅम्पल आणि पाणी नमुने घेऊन जैविक तपासणीसाठी जिल्हा प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.