सातारा प्रतिनिधी | कोरेगाव तालुक्यातील चिमणगावच्या हद्दीत २२ जनावरांची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी मुंबईतील तिघांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील २२ जनावरे राजाळे (ता. फलटण) येथील गोशाळेत पाठवण्यात आली, तर दहा लाख रुपये किमतीचे दोन ट्रक जप्त करण्यात आले आहेत.
याबाबत कोरेगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आज सकाळी आठ वाजता कोरेगाव ते पुसेगाव रस्त्यालगत चिमणगाव गावच्या हद्दीत एचपी पेट्रोल पंपासमोर खड्यातून जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने सलीम इस्लाम कुरेशी (रा. कुर्ला, मुंबई) यांच्या सांगण्यावरून नीरज प्रकाशचंद ओसवाल (वय ३४, रा. चेंबूर पूर्व, मुंबई) व सिराजउद्दीन सय्यद (वय ६४, रा. कुरेशीनगर, कुर्ला पूर्व मुंबई) हे दोघे दोन ट्रकमधून लहान मोठी एकूण २२ जनावरे वाहून नेत होते.
ही जनावरे वाहून नेताना संबंधितांनी दोन्ही ट्रकमध्ये जनावरे दाटीवाटीने कोंबली होती. त्यांना चारा, पाणी व औषधोपचाराची कसलीही व्यवस्था केलेली नव्हती तथा अत्यंत क्रूरतेने जनावरांची वाहतूक करत असताना येथील पोलिसांना आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी वरील तिघांविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करणे कायद्यान्वये गुन्हा दाखल करून ४९ हजार रुपये किमतीची २२ जनावरे व प्रत्येकी पाच लाख रुपये किमतीचे दोन ट्रक असा दहा लाख ४९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक घनशाम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विक्रांत लावंड करत आहेत.