सातारा प्रतिनिधी । पंढरपूर येथील आषाढी एकादशी सोहळ्यासाठी वारकरी व भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा सातारा विभाग सज्ज झाला आहे. दि. 21 जुलैअखेर सातारा विभागातील सर्व 11 आगारांतून 215 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
पंढरपूरचा यात्रा कालावधी दि. 13 ते 21 जुलै असा आहे. बुधवार, दि. 17 जुलै रोजी आषाढी एकादशी हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. त्यामुळे आषाढी एकादशी सोहळ्यासाठी सातारा जिह्यातून मोठय़ा प्रमाणात वारकरी भाविक पंढरपूर येथे जात असतात. त्यामुळे सातारा विभागातून सातारा 25, कराड 20, कोरेगाव 25, फलटण 30, वाई 15, पाटण 15, दहिवडी 20, महाबळेश्वर 8, मेढा 20, पारगाव खंडाळा 12, वडूज 20 अशा मिळून 215 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. मार्ग तपासणी पथकामार्फत बसेसची फलटण, बरड, मानेवाडी, मायणी, म्हसवड येथील तपासणी करण्यात येणार आहे.
पुणे प्रदेशच्या वाहतुकीसाठी यात्रा प्रमुख म्हणून चंद्रभागा बसस्थानक येथे विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड, कैलास पाटील, रमेश बांदल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात्रेसाठी कुलदीप डुबल यांची पंढरपूर येथे यात्रा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. पंढरपूर येथील जुन्या व नवीन बसस्थानकाकरील नियमित वेळापत्रकाप्रमाणे जाणाऱ्या बसेसची वाहतूक चंद्रभागा बसस्थानकावरून करण्यात येणार आहे. सातारा विभागाच्या बसेससाठी पार्किंग व्यवस्था चंद्रभागानगर येथे यात्रा बसस्थानकावर करण्यात आलेली आहे.