धोम धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरूच; धरणातून 2 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । वाई तालुक्यातील धोम धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरूच आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास धरणातील पाणीसाठा ८२.५८ टक्के झाला होता. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी आसरे बोगद्यातून कालव्यात १०० तर वीजगृहातून २०० असा ३०० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच सायंकाळच्या सुमारास सांडव्यावरुन २००० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्याचे करण्यात आला. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

सातारा जिल्ह्यात आज पावसाने उघडीप दिली होती. मात्र, कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरूच आहे. यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी दुपारपासून धरणातून विसर्ग वाढविण्यात आला. दरवाजातील विसर्ग ३० हजारावरुन ४० हजारांपर्यंत नेण्यात आला. तर पायथा वीजगृहाची दोन्ही युनीट सुरू असून त्यातून २ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरूच आहे. त्यामुळे कोयनेतून ४२ हजार १०० क्यूसेक विसर्ग होत आहे. या विसर्गामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

जिल्ह्यात मागील आठवड्यात धुवाधार पाऊस झाला. पश्चिमेकडील कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी आदी प्रमुख धरणांतही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणांमधून विसर्ग सुरू करावा लागला. सध्या पावसाचा जोर कमी झाला असलातरी धरणात आवक कायम आहे.