कराड प्रतिनिधी | राज्यभरात मराठा आरक्षणासाठी सकल मराठा बांधव पुन्हा एकदा मैदानात उतरला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. सातार्यात देखील आंदोलनाची धग वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाने मोठी घोषणा केली आहे. येत्या 13 सप्टेंबरपासून 200 गावे चक्री उपोषण सुरू करणार आहेत. तरीही तोडगा न निघाल्यास बेमुदत उपोषण केले जाणार आहे. मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी दाखले देऊन सरकार समाजात फूट पाडत असल्याचा आरोप देखील यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला.
गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या…
संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला 50 टक्के मर्यादेत ओबीसीतून आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी 13 सप्टेंबरपासून मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने चक्री उपोषण सुरु करण्यात येईल, अशी घोषणा कराड तालुका क्रांती मोर्चाच्या बैठकीत करण्यात आली आहे. या उपोषणात कराड तालुक्यातील 200 गावे सहभागी होणार आहेत. मराठा बांधवांची महाराष्ट्रात मोठी संख्या आहे. मात्र, या समाजाला गेली अनेक वर्षे आरक्षणाचे केवळ गाजर दाखवून झुलवत ठेवले आहे. अंतरावली सराटी गावात मराठा बांधवांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी गृहमंत्र्यांचा राजीनामा घेऊन पोलीस अधीक्षकांना बडतर्फ करावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी केली.
संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळावे
केवळ मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखल्याचे आश्वासन देऊन मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. वास्तविक मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देता येते. ते कसे देता येईल, हे आम्ही दाखवून देऊ, असे आव्हान मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सरकारला दिले आहे. राज्यातील प्रत्येक जातीची लोकसंख्या तपासण्यात यावी. काही जातींना दिलेले आरक्षण हे फुगीर आरक्षण आहे. त्यामुळे एकदा सर्वच आरक्षणाच्या लोकसंख्येची शहानिशा व्हावी, अशी मागणीही केली आहे.
मराठा क्रांती मोर्चाची मोठी घोषणा : मराठा आरक्षणसाठी सातार्यातील 200 गावे करणार 13 सप्टेंबरपासून चक्री उपोषण pic.twitter.com/IAIBECF8ba
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) September 6, 2023
आमची लढाई हक्कासाठी…
आरक्षण हा आमचा हक्क आहे. त्यासाठीच आमची लढाई आहे. पोलीस अथवा प्रशासनाशी आमची लढाई नसून शासनाशी आहे. राज्यातील सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळावे, हीच मराठा क्रांती मोर्चाची मागणी आहे. त्यासाठी 13 सप्टेंबरपासून चक्री उपोषण सुरू केले जाणार आहे. कराड तालुक्यातील 200 गावातील लोक या आंदोलनात सहभागी होतील. तरीही न्याय मिळाला नाही तर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल. त्यातून होणार्या परिणामास शासन, प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.