वास्तुशांतीच्या जेवणातून 200 जणांना विषबाधा, उपचारासाठी दवाखान्यांमध्ये जागा पडली अपुरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | माण तालुक्यातील म्हसवडमध्ये घराच्या वास्तुशांतीच्या जेवणातून सुमारे २०० जणांना विषबाधा झाल्याची घटना सोमवारी घडली. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या रूग्णांना उपचारासाठी रुग्णालयात जागादेखील उपलब्ध झाली नाही. या घटनेमुळे माण तालुक्यात मोठी खळबळ माजली आहे.

वास्तुशांतीच्या ठिकाणी जेवण केल्यानंतर सुरुवातीला काही लोकांना मळमळ, उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. काही वेळानंतर बऱ्याच लोकांना तोच त्रास व्हायला सुरुवात झाल्याने संबंधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी म्हसवडमधील चार खाजगी दवाखान्यात रुग्णांना जागा देखील कमी पडली. रुग्णांना १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही बाधित रुग्णांनी सरकारी दवाखान्यात उपचार घेतले.

यादरम्यान लोकप्रतिनिधींचा समर्थक आणि म्हसवडच्या माजी नगराध्यक्षांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकारांचे मोबाईल हिसकावून घेत दमदाटी करून शिवीगाळ केली. ‘तुम्हाला सोडणार नाही’ अशा शब्दात धमकी दिली. या प्रकारचा पत्रकारांनी निषेध केला आहे. दरम्यान, म्हसवडमध्ये झालेल्या विषबाधा प्रकारची आता संपूर्ण माण तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे.