सातारा प्रतिनिधी । वाई शहरातील शहाबाग फाटा येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात प्रतिक राजेंद्र जाधव (वय 20, रा. शेंदूरजणे, ता. वाई) या युवकाचा मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रतिक हा कामानिमित्त वाईला दुचाकीवरून गेला होता. काम झाल्यानंतर मंगळवारी रात्री शेंदूरजणे या आपल्या गावी निघाला. त्याची दुचाकी शहाबाग फाट्यावर आली असता समोरून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने जोराची धडक दिली.
ही धडक एवढी भीषण होती की त्यात प्रतिक काही फूट अंतरावर उडून पडला. यामध्ये जास्त रक्तस्त्राव झाल्याने प्रतिकचा जागीच मृत्यू झाला. प्रतीक हा आई-वडिलांना एकुलता एक होता. त्याच्या या अपघाती निधनानंतर गावावर शोककळा पसरली आहे. प्रतीक सातारा येथे कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत होता. अपघाताची नोंद पोलिसांत झाली असून, अधिक तपास सुरू आहे.