सातारा जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी वसतिगृहातील 20 विद्यार्थिनींना विषबाधा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील फलटण येथील कॉलेज ऑफ अ‍ॅग्रीकल्चर व कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चरच्या वसतिगृहामध्ये राहणार्‍या सुमारे 20 विद्यार्थिनींना विषबाधेचा त्रास जाणवली आहे. उलट्या, जुलाब व डोकेदुखीचा त्रास झाला. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असून अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

पगकतन येथील कॉलेज ऑफ अ‍ॅग्रीकल्चर व कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चरच्या वसतिगृहामध्ये सुमारे दोनशे विद्यार्थिनी राहत आहेत. रविवार दि. 31 डिसेंबर रोजी रात्री जेवण करून झोपल्यानंतर दुसर्‍या दिवशी दि. 1 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास काही मुलींना उलट्या, जुलाब व डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दि 2 जानेवारी रोजी वसतिगृहातील आणखीन काही मुलींना असाच त्रास जाणवू लागल्याने त्यांनाही याच रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. याची माहिती मिळताच विद्यार्थिनींच्या पालकांनी रुग्णालयात धाव घेतली.

या विद्यार्थीनींना अन्नातून विषबाधा झाली असावी, असे डॉक्टरांच्यावतीने सांगण्यात आले. या रुग्णालयात 20 विद्यार्थिनींवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर व धोक्याच्या बाहेर आहे. त्यांना वसतिगृहामध्ये अथवा त्यांच्या घरी पाठवण्यात येणार आहे. याबाबत मुलींच्या सर्व आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्याबरोबरच वसतीगृहामधील पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.