सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणासाठी विविध प्रकारे आंदोलने करून शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले जात आहे. त्याच पद्धतीने सातारा येथे मराठा समाजातील दोन युवकांनी काल चक्क दंडवत घालत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी त्यांनी मराठा समाजास आरक्षण तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी केली.
सातारा जिल्ह्यात मराठा आरक्षण मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. अनेक संघटनांचा देखील आंदोलनास पाठींबा मिळत असताना सातारा तालुक्यातील नागठाणे येथील दत्तात्रय ढाणे व बोरगाव येथील प्रकाश साळुंखे या दोन मराठा समाजातील युवकांनी काल सातारा येथील पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तसेच तेथून चक्क रस्त्याने दंडवत घालत जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार गाठले.
यावेलो दोघे युवक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर साखळी उपोषणास बसलेल्या मराठा आंदोलकांच्या मंडपात जाऊन सहभागी झाले. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करतच राहू, असा निर्धार यावेळी युवकांनी व्यक्त केला.