सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यामधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कास परिसरातील एकिव धबधब्याच्या कड्यावरून रविवारी दोन तरुण ७०० ते ८०० फूट खोल दरीत कोसळले. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. पाऊस व अंधारामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास पावसामुळे अडथळे येत होते. हे दोन तरुण सातारा तालुक्यातील बसप्पाचीवाडी व करंजे पेठ येथील असून अक्षय आंबवले व गणेश फडतरे अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी सुट्टीचा वार असल्याने जावळी तालुक्यातील एकीव धबधब्यावर फिरण्यासाठी चार तरुण गेले होते. त्यावेळी ते मद्यधुंद अवस्थेत होते. या अवस्थेतच त्यांच्यात भांडणे झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. भांडण सुरू असतानाच मुख्य धबधब्याच्या खालच्या बाजूला गेले असता दोघेजण ७०० ते ८०० फूट खोल दरीत कोसळले.
या घटनेची माहिती मिळताच मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत साताऱ्यातून शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीम व महाबळेश्वर टेकर्सचे जवानही घटनास्थळी मदत कार्यासाठी पोहचले.
रात्रीची वेळ, मुसळधार पाऊस व अवघड जागा असल्यामुळे घटनास्थळी मदत कार्य करण्यास व त्यांच्यापर्यंत पोहचण्यास अडचणी येत होत्या. रात्री उशिरा या दोघा युवकांपर्यंत पोहोचण्यास रेस्क्यू टीमला यश आले आहे. त्यांना दोन्ही तरुणांचे मृतदेह सापडले असून ते वर काढण्याचे काम सुरू होते.