कराड प्रतिनिधी | सोन्याचे मणी देण्याचे अमिष दाखवून वृद्ध महिलेकडे असलेली बोरमाळ 2 महिलांनी लंपास केल्याची घटना कराड शहरातील पी. डी. पाटील उद्यानात शुक्रवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन अज्ञात महिलांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत मालन राजाराम पवार (वय ८१, रा. गुरूवार पेठ, कराड) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गुरूवार पेठेत राहत असलेल्या मालन पवार या शुक्रवारी दुपारी काही कामानिमित्त भाजी मंडईकडे निघाल्या होत्या. त्यावेळी एक वृद्ध महिला त्यांच्याजवळ आली. तीने तीच्याजवळ सोन्याचे मणी आहेत, असे सांगितले. त्याचवेळी एक तरुण महिला त्याठिकाणी आली. तीनेही ते मणी खरेदी करणार असल्याचे सांगितले.
त्यानंतर मालन पवार यांना घेवून त्या दोघी रिक्षातून पी. डी. पाटील उद्यानात गेल्या. त्याठिकाणी वृद्ध महिलेने तिच्याकडील गाठोड्यात असलेले सोन्याचे मणी दाखवले. त्यातील अर्धे मणी तिने तरुण महिलेला तर अर्धे मालन पवार यांना दिले. त्यामोबदल्यात मालन पवार यांच्या गळ्यातील बोरमाळ त्यांनी काढून घेतली. मणी दिल्यानंतर त्या दोघींनी पुन्हा रिक्षा करुन मालन पवार यांना शहरातील कन्या शाळेजवळ सोडून त्या निघून गेल्या.
मालन पवार यांनी घरी आल्यानंतर घडलेला प्रकार नातवाला सांगीतला. नातवाने गाठोडे उघडून पाहिले असता त्याच्यात सोन्याचे मणी नसून माती असल्याचे त्याला दिसले. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर मालन पवार यांनी याबाबतची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरुन दोन अज्ञात महिलांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.