सातारा प्रतिनिधी | संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नागपूरहून आलेल्या दोन वारकऱ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना फलटणजवळील भरड, ता. फलटण, जि. सातारा येथे घडली.
मृतांमध्ये मधुकर शेंडे आणि तुषार रामेश्वर बावनकुळे (दोघेही रा. राजाबाक्षा, जि. नागपूर) यांचा समावेश आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी-पंढरपूर वारीमध्ये सहभागी होण्यासाठी हे दोघेही नागपूरहून आले होते. पालखी सोहळा फलटण परिसरात पोहोचल्यावर बारड येथे मुक्काम करण्यात आला होता. विसाव्यासाठी तात्पुरते तंबू उभारण्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला.
लोखंडी रॉडचा स्पर्श आणि विजेचा धक्का…
प्राथमिक माहितीनुसार, टेंट उभारणीच्या कामादरम्यान तुषार बावनकुळे यांचा हात चुकून लोखंडी रॉडला लागला. संबंधित रॉड विद्युतप्रवाहाच्या संपर्कात असल्याने त्यांना तीव्र विजेचा धक्का बसला. त्यांना वाचविण्यासाठी धावून गेलेल्या मधुकर शेंडे यांनाही विजेचा धक्का बसला आणि दोघांचाही घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला.
वारकरी संप्रदायात शोककळा
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त होत आहे. पालखी सोहळा श्रद्धा, भक्ती आणि अनुशासनाचा प्रतीक मानला जात असताना अशा अपघातामुळे भाविकांमध्ये शोक आणि चिंता निर्माण झाली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.