कराड प्रतिनिधी | स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या १८ व्या राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शनास थाटात प्रारंभ झाला आहे. प्रदर्शनात तिसऱ्या दिवशी जनावरांची स्पर्धा घेण्यात आली. दरम्यान प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरला तो 2 टनाचा गजेंद्र रेडा आणि तीन ते साडे तीन फूट उंचीची बुटकी गाय. गजेंद्र रेडा आणि बुटकी गाय पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.
कराड कृषी उत्पन्न बाजार समिती आणि डायनॅमिक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी प्रदर्शनास मोठ्या संख्येने जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील लोक मोठ्या संख्येने भेट देत आहेत.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी सहकार मंत्री लोकनेते स्व. विलासराव पाटील – उंडाळकर यांच्या संकल्पनेतून कराड येथे कृषी प्रदर्शनाला सुरूवात झाली. कराड शेती उत्पन्न बाजार समिती आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या विद्यमाने गेली १८ वर्षे हे कृषी प्रदर्शन होत आहे. शेती उत्पन्न बाजार समितीने प्रदर्शनाची परंपरा कायम ठेवत यंदाही भव्य स्वरूपात प्रदर्शन पार पडत आहे. प्रदर्शनास तिसऱ्या दिवशी रविवार असल्याने मोठ्या संख्येने नागरिकांनी भेट दिली.
स्वा. सै. शामराव पाटील फळे व भाजीपाला मार्केटच्या आवारात भरविण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे राजेंद्र हेळकर यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेल धान्य विक्रीसाठी
कृषी प्रदर्शनात धान्य महोत्सवाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेले धान्य या ठिकाणी आणून त्यांना विक्री करता यावी, या उद्देशाने यंदा या ठिकाणी प्रथमच धान्य महोत्सव भरवित आलेले आहे. त्यानुसार प्रदर्शनात शेतकऱ्यांनी पिकवलेले धान्य विक्रीसाठी आणलेले आहे.
४०० पेक्षा अधिक विविध प्रकारचे स्टॉल्स सहभागी…
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण कृषी पर्धर्षणात शेतक-यांनी त्यांच्या कृषी मालाच्या विक्रीसाठी स्टॉल उभारले आहेत.
प्रदर्शनात 2 टनाचा ‘गजेंद्र’ ठरतोय आकर्षण
कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण कृषि औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनात गजेंद्र नावाचा 2 टन वजनाचा रेडा सहभागी झाला आहे. बेळगांव येथील ज्ञान देव नाईक यांचा हा रेडा असून त्याचे वजन 2 टन असल्याने त्याचे नांव त्यांनी गजेंद्र ठेवले आहे. अनेक प्रदर्शनात हा रेडा सर्वाचा कुतूहल व आकर्षणाचा विषय राहिला आहे. या रेड्याचा प्रतिदिनी 2500 ते 3000 हजार इतका खर्च असून रोज 5 किलो सफरचंद ,गव्हाचा आटा, आणि काजू चा खुराक दिला जातो. या गजेंद्र ने महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक प्रदर्शन गाजवली असून 1.5 कोटी रुपयांची मागणी या रेड्याचा आली होती. या रेड्याला बघण्यासाठी स्वंतत्र व्यवस्था केली. तो लोकांसाठी खास आकर्षण ठरत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्रदर्शन
कराड येथील कृषी प्रदर्शनास दरवर्षी लाखो शेतकरी, लोक भेटी देतात. यंदाच्या वर्षी देखील लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हे सर्वात मोठे प्रदर्शन आलेल्या या प्रदर्शनास शेतकरी परिसंवाद कार्यक्रम देखील पार पडत आहे.