कोरेगावात 2 शशिकांत शिंदे अन् 4 महेश शिंदे; एकाच नावाच्या उमेदवारांची लाट, कुणाची लागणार वाट?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत काल संपली आहे. कोरेगाव विधानसभा मतदार संघात मात्र अजब प्रकार पाहण्यास मिळाला आहे. या ठिकाणी एकाच नावाचे दोन-दोन, चार-चार उमेदवार मैदानात उतरले आहे. काल शेवटच्या दिवशी मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत कोरेगावात मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले आहेत. २०१९ च्या निवडणुकीप्रमाणे २०२४ मध्येही आमदार शशिकांत शिंदे यांचे नामसाधर्म्य असणाऱ्या दोन उमेदवारांनी व आमदार महेश शिंदे यांचे नामसाधर्म्य असणाऱ्या तीन उमेदवारांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा द्विस्ट पाहावयास मिळत आहे.

२०१९ च्या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांची आमदार महेश संभाजी शिंदे यांच्याशी थेट लढत झाली होती. त्यावेळेस शशिकांत जगन्नाथ शिंदे यांच्यासह महेश गुलाब शिंदे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र त्यांना एकूण मतदानाच्या दोन टक्के अथवा त्यापेक्षा कमी मते मिळाली होती. यावेळी सोमवारी शशिकांत धर्माजी शिंदे या (रा. लिंब, ता. सातारा ) अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला होता.

मंगळवारी शिंदेसेनेचे उमेदवार महेश संभाजी शिंदे या (कोपरखैराणे- नवी मुंबई) यांच्यासह महेश सखाराम शिंदे (रा. कोंढवली), महेश किसन शिंदे (रा. आसनगाव) यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. २०१९ च्या निवडणुकीतही नावात साधर्म्य असलेल्या या उमेदवारांनी आपले नशीब आजमावले होते.

मतदारांत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न

हे दोन्ही उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिल्यास मतदारांसमोर संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. मतदारांना चकवा देण्यासाठी आणि उमेदवाराची मते विभागली जाण्यासाठी ही राजकीय खेळी खेळली जाते आहे की काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

भरली अनामत रक्कमेची १० हजाराची चिल्लर

कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शशिकांत धर्माजी शिंदे या अपक्ष उमेदवाराने अर्जासोबत अनामत रकमेपोटी द्यावयाची 10 हजार रुपयांची रक्कम चिल्लर अधिकार्‍यांकडे सोपवली. त्यांनी पिशव्यांमध्ये नाणी भरून आणलेली होती. ही चिल्लर मोजता मोजता कर्मचार्‍यांच्या नाकी नऊ आले.