सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील परखंदी गावच्या हद्दीत एमआयडीसी रस्त्यावरील चौकात पिस्टल खरेदी विक्री करण्याकरीता आलेल्या दोन युवकांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून २ देशी बनावटीची पिस्टल, २ काडतूस, ५ हजार ५०० रुपये रक्कम, २ मोबाईल व एक दुचाकी मोटार सायकल असा एकुण २ लाख ५५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आचारसंहिता कालावधीत स्थानिक गुन्हे शाखेकडून धडाकेबाज कारवाई, वाईमध्ये 2 पिस्टल हस्तगत pic.twitter.com/RYdmoI0YpB
— santosh gurav (@santosh29590931) June 3, 2024
१) स्वप्नील उर्फ सोन्या प्रदिप जगताप (वय २६,रा. सुलतानपुर ता. वाई जि. सातारा), २) गणेश कमल राठोड (वय २५,रा. सोनवडी ता. दौंन्ड जि.पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांनी लोकसभा निवडणुक प्रक्रिया २०२४ च्या अनुषंगाने आचारसंहिता कालावधीत बेकायदेशीर शस्त्रे व अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांना दिलेल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिपत्याखालील सपोनि सुधीर पाटील व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार केले होते.
दरम्यान, पोलीस निरीक्षक श्री. अरूण देवकर यांना खास बातमीदारामार्फत माहिती समजली की, परखंदी गावच्या हद्दीत एमआयडीसी रस्त्यावरील चौकात पिस्टल खरेदी विक्री करण्याकरीता दोन युवक येणार आहेत. माहिती मिळाल्यानंतर त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. सुधीर पाटील व त्यांच्या अधिपत्त्याखाली असलेल्या पथकास पोलीस निरीक्षक श्री. अरूण देवकर यांनी सुचना देऊन वाई एम.आय.डी.सी परिसरात पेट्रोलींग करून कारवाई करणेबाबत सुचना दिल्या.
दि. ०३/०६/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व त्यांच्या अधिपत्त्याखाली असलेल्या पथकाने वाई एम.आ.डी.सी. परिसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एक युवक मिळालेल्या माहितीच्या ठिकाणाजवळ झाडाखाली त्याचे मोटारसायकलसह थांबलेला दिसून आला. त्याचेकडे दुसरा युवक रस्त्याने चालत येताना दिसला दोन्ही युवक एकमेकांचे जवळ येवून बोलत असताना पथकास शंका आल्याने त्यांना जागीच पकडून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ देशी बनावटीची पिस्टल, २ काडतूस, ५५०० रुपये रक्कम, २ मोबाईल व एक दुचाकी मोटार सायकल असा एकुण २ लाख ५५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. तसेच त्या दोन्ही युवकाविरुध्द वाई पोलीस ठाणेत शस्त्रबंदी कायदयाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
नोव्हेंबर 2022 पासून ते आजपर्यंत 89 देशी बनावटीची पिस्टल जप्त
सातारा पोलीस दलाने नोव्हेंबर २०२२ पासून ते आजपर्यंत ८९ देशी बनावटीची पिस्टल, ३ बारा बोअर बंदूक, १ रायफल, १९९ जिवंत काडतुसे, व ३८५ रिकाम्या पुंगळ्या, १ रिकामे मॅग्झीन असे जप्त करण्यात आलेले आहेत.