सातारा प्रतिनिधी | तासवडे एमआयडीसीतील एक खळबळजनक घटना घडली आहे. पाईप लिकेजमुळे गॅस गळती होऊन 2 कामगारांना श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना उंब्रजच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही कामगार हे परप्रांतिय असल्याचे समजते. रॉयल फूडस् प्रा. लि. या कंपनीत शुक्रवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. या घटनेला तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरूटे यांनी दुजोरा दिला आहे. तसेच तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत घटना स्थळवरून मिळालेली माहिती अशी की. तासवडे एमआयडीसीतील रॉयल फूडस् प्रा. लि. ही मोठी कंपनी आहे. या कंपनीत फळ प्रक्रियेद्वारे अनेक उत्पादने तयार केली जातात. या कंपनीतील कर्मचार्यांची संख्याही मोठी आहे. शुक्रवारी सायंकाळी कंपनीत पाईप लिकेजमुळे अमोनिया गॅसची गळती झाल्याने दोन परप्रांतिय कामगारांना श्वसनासह उलट्या, खोकल्याचा त्रास होऊन लागला. त्यामुळे प्राथमिक उपचारासाठी त्यांना उंब्रजमधील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
गॅस गळतीमुळे कामगारांना श्वसनाचा त्रास झाल्याने एमआयडीसीत एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मंडल अधिकारी बोडके हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा अहवाल वरिष्ठ अधिकार्यांना सादर केला आहे. तसेच तळबीड पोलीस ठाण्यातही घटनेची माहिती दिली. त्यानंतर तळबीड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. मंडल अधिकारी बोडके यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी गॅस गळती झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला. तसेच यासंदर्भातील अहवाल पाठविला असल्याचे सांगितले.
दरम्यान, तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरूटे यांच्याशी संपर्क साधला असता, रॉयल कंपनीत अमोनिया गॅस गळती झाल्याची माहिती दिली. तसेच श्वसनाचा त्रास झालेल्या दोन्ही कामगारांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले. याप्रकरणी संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी आज सकाळी कंपनीत येऊन घटनेची माहिती घेतली आहे. तक्रार दाखल होताच याप्रकरणी गुन्हा नोंद करणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरूटे यांनी सांगितले.