बिबट्याच्या हल्ल्यात शेवाळेवाडीत 2 शेळ्या ठार तर नांदगावात डॉबरमॅन कुत्रा गंभीर जखमी

0
142
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील उंडाळे विभागातीळ शेत शिवारात सध्या बिबट्याची डरकाळी ऐकू येत आहे. बिबट्याकडून आठवडाभरात दोन गावात हल्ले करण्यात आले आहेत. दि. १४ रोजी केलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात शेवाळेवाडी येवती येथील माणिक भगवान शेवाळे यांच्या गोठ्यातील दोन शेळ्यांचा मृत्यू झाला तर नांदगाव येथील पाटील मळा परिसरात किरण थोरात यांच्या घराबाहेर बांधलेल्या डॉबरमॅन कुत्रा गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसापासून उंडाळे विभागात शेत शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे नागरिकांना दिसून येत आहे. रात्रच्या सुमारास बिबट्याकडून पाळीव जनावरे, शेळींवर देखील हल्ले केले जात आहेत. दरम्यान, १४ जुलै रोजी बिबट्याने शेवाळेवाडी येवती येथील माणिक भगवान शेवाळे यांच्या गोठ्यात बांधलेल्या दोन शेळ्यांवर हल्ला केला. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील त्याठिकाणी जाऊन पंचनामा केला. शेवाळेवाडीत शेळ्यांवर हल्ला केल्यानंतर बिबट्याचा वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शोध घेतला जात होता.

त्यानंतर सोमवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास नांदगाव येथील पाटील मळा परिसरात किरण थोरात यांनी घराबाहेर साखळीने बांधलेल्या डॉबरमॅन कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. थोरात यांनी जेव्हा त्यांचा कुत्रा घराबाहेर बांधलेला होता. तेव्हा तो जोरात भुंकायला अन् व्हिवळायला लागला. हे लक्षात आल्यावर थोरात यांनी कुत्रा बांधलेल्या ठिकाणच्या वरची घराची खिडकी आतूनच उघडली. मात्र, खिडकीचा आवाज होताच बिबट्याने धूम ठोकली. सुदैवाने डॉबरमॅन साखळीमध्ये बांधला असल्याने बिबट्या त्याला घेऊन जाऊ शकला नाही. त्यानंतर किरण थोरात यांनी डॉबरमॅन कुत्र्याची पाहणी केली असता त्याच्या मान व गळ्यापासून रक्तस्राव होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ही माहिती वनविभागाला कळवल्यानंतर वनविभागाचे अधिकारी मंगळवारी सकाळी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या सोबत आलेल्या डॉक्टरांनी कुत्र्यावरती उपचार केला आहे.