सातारा प्रतिनिधी | सातारा शहरालगत महामार्गावरील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात दोन कार जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून कारचे मात्र, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सातारा शहरालगत गॅस भरत असताना ही घटना घडली असून एका कारमध्ये गॅस भरताना ती पेटल्याने शेजारील उभी असलेली कारही जळाली. गॅसकिट असलेल्या कारमध्ये गॅस भरला जात असताना अचानक तिने पेट घेतला. यामुळे क्षणात आगडोंब उसळला. पेट घेताच परिसरातील नागरिकांची घाबरगुंडी उडाली. घटनास्थळावरून संबंधितांनी पळ काढला. एक कार पेटली असतानाच शेजारी उभ्या असलेल्या कारलाही त्या आगीची झळ बसली. पाहता पाहता क्षणात उभ्या असलेल्या दुसर्या कारनेही पेट घेतला.
दोन्ही कारला आग लागल्यानंतर नागरिकांनी अग्निशामक दलाला याची माहिती दिली. नगरपालिकेचे अग्निशामक दलाचे वाहन पोहचले व त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सुमारे अर्धा तासाहून अधिक काळ हा थरार सुरु होता. बघ्यांची परिसरात गर्दी झाली होती. अग्निशामक दलाने पाणी मारल्यानंतर आग आटोक्यात आणली. मात्र आगीत वाहने पूर्णपणे जळाल्याने वाहनांचा सांगाडा राहिला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.