कराडच्या भर चौकात 2 कारचालकांची जुंपली अन् 1 किलो मीटरपर्यंत झालं ट्रॅफिक जाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड येथील दत्त चौकात शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास चांगलीच वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडी होण्यामागचे कारणही तसे होते. कारण या ठिकाणी दोन कार चालकांच्यात एकमेकांना कार घासण्यावरून वादावादी झाली. तब्बल तासभर चाललेल्या या वादावादीमुळे दत्त चौकापासून ते कोल्हापूर नाक्यापर्यंत सुमारे एक किलो मीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. अखेर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही वाहनचालकांना ताब्यात घेतले. आणि त्यांची वाहने पोलीस ठाण्यात घेऊन जात निर्माण झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमार कोल्हापूर नाक्याहून शाहू चौक मार्गे एसटी बस स्थानकाकडे चारचाकी गाडी क्रमांक (MH14FC 5420) आणि दुसरी चारचाकी गाडी क्रमांक (MH11DA 2689) हि एकमेकांच्या पाठीमागून निघाली होती. दोन्ही गाड्या दत्त चौकात आल्या असता पुढे निघालेल्या एका गाडी चालकास बाजूने निघालेल्या गाडीचालकाने त्याची गाडी बाजूला दाबली. यामध्ये दोन्ही गाड्या एकमेकांना घासल्या गेल्या. यानंतर दोन्ही कार चालकांनी आपापल्या कारमधून खाली उतरत भर रस्त्यात वादावादी घालण्यास सुरुवात केली. यावेळी बाजूने निघालेल्या इतर गाड्याहि थांबल्या. पुढे जाण्यास वाट नसल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली.

सुरुवातील कारमधील दोन्ही चालकांच्यात शाब्दिक चकचक सुरु असताना एक कारमधून काही महिलाही खाली उतरल्या. त्यांनीही दुसऱ्या कारचालकाशी वादावादी घालण्यास सुरुवात केली. या अचानक घडलेल्या प्रकारामध्ये दोन्ही कार चालकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचेही भान राहिले नाही. दत्त चौकात निर्माण झालेली वाहतूक कोंडी हि कोल्हापूर नाक्यापर्यंत पोहचली. या ठिकाणी असलेल्या काही व्यापाऱ्यांनी घडलेल्या प्रकारची कराड शहर पोलीस ठाणे व वाहतूक शाखेतीळ कर्मचाऱ्यांना फोन करून माहिती दिली.

तब्बल तासभराच्या वादावादीनंतर उपनिरीक्षक अर्जुन चोरगे, अपघात शाखेचे धीरज चतुर, शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या महिला कॉन्स्टेबल देशमुख व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी रस्त्यावर निर्माण झालेली वाहतूक कोंडी सुरुवातीला सुरळीत केली. यानंतर दोन्हीक वाहने व वाहनचालकांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले. या घटनेची अधिक माहिती घेण्याचे काम शहर पोलिसांकडून केले जात आहे.