यवतेश्वरला 2 कारची भीषण धडक : सातारा पालिकेतील कर्मचारी तरुणी जागीच ठार; 1 गंभीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा शहराजवळ असणाऱ्या यवतेश्वर घाट परिसरात दोन कारची समोरासमोर भीषण धडक झाल्याची दुर्घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या अपघातात सातारा पालिकेतील कर्मचारी २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला.

गायत्री दीपक आहेरराव (वय २१, रा. शनिवार पेठ, सातारा) असे अपघातात ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर ओंकार लोखंडे (वय २४, रा. प्रतापगंज पेठ, सातारा) याच्यासह अन्य एकजण या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. ओंकारला पुढील उपचारासाठी पुणे येथे नेण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गायत्री आहेरराव ही तरुणी कारमधून कासवरून साताऱ्याकडे येत होती. याचवेळी साताऱ्याकडून कारमधून तीन तरुण कासकडे निघाले होते. या दोन्ही कारची यवतेश्वरजवळ भीषण धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही कारच्या पुढील बाजूचा अक्षरश: चक्काचूर झाला. यात गायत्री आहेरराव या तरुणीच्या डोक्याला तसेच हाता पायाला गंभीर जखम झाली. तर ओंकार लोखंडे हा सुद्धा गंभीर जखमी झाला.

या अपघाताची माहिती मिळताच शिवेंद्रसिंहराजे ट्रेकरचे जवान आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. चक्काचूर झालेल्या कारमधून गायत्रीला अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तिला तातडीने साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ओंकार लोखंडे याचीही प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला तातडीने पुणे येथे हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातप्रकरणी अनोळखी कार चालकावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार विशाल मोरे हे अधिक तपास करीत आहेत.

एअर बॅग उघडूनही मृत्यू…

दोन्ही कारची भीषण धडक झाल्यानंतर एअर बॅग उघडल्या. मात्र, तरी सुद्धा गायत्रीचा मृत्यू झाल्याने पोलिसही अवाक् झाले आहेत. तिने सीट बेल्ट व्यवस्थित लावला होता की नाही, हे तपासानंतरच समजणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दोन्ही वाहने पोलिस ठाण्याच्या आवारात आणण्यात आली आहेत.

खा. उदयनराजे भोसले यांनी वाहिली श्रद्धांजली

आमचे निकटवर्तीय मित्र कै दीपक आहेरराव यांची सुकन्या कु. गायत्री दिपक आहेरराव हिचा काल दुर्देवी अपघातात मृत्यु झाला. हे समजल्यानंतर मनाला प्रचंड वेदना झाल्या. भूतकाळातील अनेक घटना वेगाने तरळून गेल्या. श्री आहेरराव परिवाराशी आमचा अत्यंत घनिष्ट ऋणानुबंध आहे.

कै. दीपक यांचेही काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले होते आणि आज परत हा दुःखाचा डोंगर आहेरराव कुटुंबियांवर आला वहीनी श्रीमती ज्योती आहेरराव यांनी अतिशय कष्टांने व जिद्दीने सर्व अडचणींना सामोरे जाऊन मुलांची शिक्षण व सर्व गोष्टींची पूर्तता केली आज त्यांच्यासाठी काय भावना व्यक्त कराव्यात हेच समजत नाही आम्ही निशब्द आहोत. नुकतीच नगरपरिषदेच्या सेवेत गायत्री रुजू झाली होती, याचे समाधान होते. परंतु हे समाधान अल्पकालावधीचे ठरले. तिच्या अचानक एक्झीटची सल मनात कायम टोचत राहील. आहेरराव कुटुंबाच्या दुखात आम्ही सहभागी आहोत. कुटुंबियांसह मित्रपरिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. गायत्रीच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी पोस्ट खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.