सातारा प्रतिनिधी । विद्युत डीपीचा शॉक लागून 2 बैलांचा मृत्यू झाल्याची तर बैलगाडीमधील तिघेजण जखमी झाल्याची घटना सातारा तालुक्यातील वेचले गावात आज घडली. या घटनेनंतर आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांवर चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्यातील वेचले गावात आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास सोयाबीन पेरणीसाठी काही शेतकरी बैलगाडीतून निघाले हाेते. त्यावेळी अचानक बैलांना विजेचा जोरात झटका बसला. अचानक झटका बसल्यानंतर बैलं जागेवरच खाली पडली. तर बैलगाडीत शेतकरी खाली पडले. या घटनेत बैलांचा जागीच मृत्यू झाला तर बैलगाडीमधील शेतकरी देखील जखमी झाले.
विजेचा शॉक लागून बैलांचा मृत्यू, शेतकरी जखमी; सातारा महावितरण कार्यालय जाळून टाकण्याचा इशारा pic.twitter.com/CtZ3jo4Q1J
— santosh gurav (@santosh29590931) June 21, 2024
हि घटना घडल्यानंतर त्याची माहिती गावात समजताच घटनास्थळी गावातील शेतकरी आणि परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. काही ग्रामस्थांनी घटनेची माहिती पाेलिसांनी तसेच महावितरण कार्यालयास दिली. दरम्यान, या घटनेचा जाब विचारात महावितरणच्या कारभारा विरोधात वेचलेतील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला. महावितरण विभागाने जखमी शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अन्यथा महावितरण कार्यालय जाळून टाकू, असा इशारा ग्रामस्थांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिला.