खुनाचा प्रयत्न व जबरी चोरीच्या गुन्ह्यातील 2 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात खुनाचे केलेले प्रयत्न व चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना जेरबंद करण्यात सातारच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास यश आले आहे. या पथकाकडून दोन आरोपींचा शोध घेत त्यांना अटक करण्यात आली आहे. अकिब जावेद कासमसाहेब नंदगळकर (रा. निसर्ग कॉलनी, बुधवार नाका सातारा) व प्रितम अशोक पवार, (वय ३६, रा.प्लॉट नं.७, सिंधु निवास आझादनगर शाहुपूरी) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर सातारा यांनी सातारा जिल्हा पोलीस दलाचे अभिलेखावरील पाहिजे / फरारी आरोपींचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिलेल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना फरारी आरोपींचा शोध घेण्याचे निर्देश दिले.

मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने दि. २१ जुलै रोजी सातारा शहर पोलीस ठाणे गु. र. नं. ११२७/२०१८ भादविक ३९२, ३४ या गुन्हयातील ५ वर्षापासून फरार असलेला आरोपी अकिब जावेद कासमसाहेब नंदगळकर यास सातारा शहरातून ताब्यात घेतले. तसेच सातारा शहर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे. त्यानंतर आज दि. २२ रोजी शाहुपूरी पोलीस ठाणे गु. र. नं. १९५/२०२१ भादविक ३०७, १४१, १४३, १४७, १४८, १४९ या गुन्हयातील २ वर्षापासून परागंदा असलेला आरोपी प्रितम अशोक पवार यास सातारा शहरातून ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतल्यानांतर चौकशी अंती त्याला शाहुपूरी पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे.

समीर शेख व बापू बांगर यांच्या सुचनाप्रमाणे व पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार शरद बेबले, लैलेश फडतरे, प्रविण फडतरे, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, ओमकार यादव, मोहन पवार, अमित माने, विशाल पवार, रोहित निकम यांनी सदरची कारवाई केली असून कारवाई मधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.