सातारा प्रतिनिधी । बामणोली वनपरिक्षेत्रात असलेल्या जावळी तालुक्यातील मुनावळे परिसरात व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये’ अवैधरित्या वृक्षतोड करणाऱ्या प्रशांत डागा, शामसुंदर भंडारी, गणेश दिनकर भोसले यांना तब्बल २ लाख ४५ हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. थेट वनमंत्री आणि प्रधान सचिवांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे.
प्रधान सचिवांनी या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालकांनी जलदगतीने चौकशी करत झाडे तोड अधिनियम १९६४ नुसार हा दंड केला असून सह्याद्री वाचवा मोहिमेंतर्गत या प्रकरणाचा पाठपुरावा केल्याने प्रशासनाकडून पैशाच्या जोरावर मनमानी करणाऱ्यांवर ही दंडात्मक कारवाई आहे.
साताऱ्यातील धनदांडगे बिल्डर, भूमाफीयांनी जावली तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात बफर झोन असलेल्या भागात मुनावळे गावाच्या २९/३ हद्दीत खाजगी जमीन खरेदी केली आहे. याच जमीनीवरील स्वतःचा स्वार्थी हेतू सफल करण्यासाठी दुर्मिळ वृक्षांची अवैधरित्या कत्तल केली. याची सह्याद्री वाचवा मोहिमेंत काम करणारे प्रमुख कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी याबाबत सर्व माहितीसह सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे तक्रार दाखल केली होती. तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रधान सचिव वेनू गोपाल रेड्डी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनाही याबाबत दखल घेण्यासाठी सुशांत मोरे यांनी पत्रव्यवहार केला.
त्यानंतर खडबडून जागे झालेल्या वन विभागाने स्थळ पाहणी केली असता २८० झाडांची अवैध तोड झाल्याचे निदर्शनास आले. याची चौकशी केली असता प्रशांत रमेश डागा (यादोगोपाळ पेठ, सातारा), शामसुंदर गोवर्धन भंडारी (संपदानगरी, सोमवार पेठ, पुणे), तू गणेश दिनकर भोसले (मुनावळे ता. मी जावली) यांनी ही वृक्षतोड केल्याचे स्पष्ट झाले.
प्रत्येक रुपये ५०० प्रमाणे ३५ हजार अशी दंडात्मक कारवाई
यात प्रशांत रमेश डागा, शामसुंदर त गोवर्धन भंडारी यांना २१० वृक्षांची तोड केल्याने प्रत्येकी रुपये १ हजार प्रमाणे २ लाख १० हजार तर गणेश भोसले यांनी ७० तोडलेल्या वृक्ष पोटी प्रत्येक रुपये ५०० प्रमाणे ३५ हजार अशी एकूण २ लाख ४५ हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत वनपरिक्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तत्काळ चौकशी करत प्रकरण निकाली काढले.
दंडात्मक कारवाईतून इतरांनी धडा घ्यावा : सुशांत मोरे
याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. यावेळी मोरे महाले की, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात धनदांडगे पैशाच्या जोरावर जमीन खरेदी करत सुटले आहेत. यात पुणे, मुंबई येथील बिल्डर, व्यापारी, उद्योजकांचा शिरकाव होऊ लागला आहे. आता सह्याद्री वाचवा मोहिमेचे सतर्क कार्यकर्ते यावर लक्ष ठेवून आहेत. यातच मुनावळे परिसरात वृक्षतोड प्रकरणी कारवाई केली नाही तर दि. १४ ऑगस्ट पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर वनमंत्री, प्रधान सचिव, सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले. संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याप्रकरणी केलेल्या नियमानुसार दंडात्मक कारवाईतून इतरांनी धडा घ्यावा, असे मोरे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी संवाद साधताना म्हंटले.