सातारा प्रतिनिधी | पाझर तलावात हात-पाय धुण्याकरता गेलेल्या 19 वर्षीय युवकाचा आई-वडीलांसमोर पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना खंडाळा तालुक्यातील मिरजेवाडी गावच्या हद्दीत पायकडा या शिवारात घडली. रितेश मोहन साळुंखे (वय 19, रा.मिरजेवाडी, ता.खंडाळा) असे तलावात बुडून मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कात्रज, पुणे येथे कामानिमित्त स्थायिक असलेले मोहन साळुंखे हे खंडाळा तालुक्यातील मूळगावी मिरजेवाडी येथे गहू काढण्याकरता मुले व पत्नी समवेत आले होते. गहू काढणी झाल्यानंतर रितेश हा शेतानजिकच्या पाझर तलावावर हात-पाय धुण्याकरता गेला होता. यावेळी पाण्यात तोल जावून तो पडला.
पाण्याचा आवाज आल्याने मोहन साळुंखे व त्यांच्या पत्नीने धाव घेतली. त्यांनी आरडाओरडा केला. मात्र, त्यांच्या मदतीला कोणीच आले नाही. त्यामुळे रितेश पाण्यात बुडाला. यावेळी आई-वडिलांनी केलेला आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता.या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रितेशला तलावातून बाहेर काढण्यासाठी शिरवळ रेस्क्यू टिम, भोईराज आपत्ती व्यवस्थापन संघ भोर यांना पाचारण करण्यात आले. चार तासानंतर रितेशचा मृतदेह शोधण्यात यश आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.