सातारा प्रतिनिधी | संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात प्रशासनाकडून जास्तीत जास्त सोयी सुविधा पुरवण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्चच्छता विभागाच्या देखरेखीखाली जिल्ह्यातील प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी अठराशे फिरती शौचालये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. याठिकाणी वारकऱ्यांना विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ८६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात लाेणंद येथे दोन, तरडगाव, फलटण व बरड असे पाच मुक्काम असून वारकऱ्यांना अन्य सोयी सुविधा पुरवून देण्याबरोबरच त्यांना फिरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे.
सोहळ्या दरम्यान व सोहळ्यानंतर परिसरात साथीचे आजार पसरु नयेत यासाठी प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मु्ख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी १८०० फिरती शौचालये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
पाणी व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून भाविकांना सोयी सुविधा पुरवण्याबरोबर या सुविधा उपलब्ध असणाऱ्या ठिकाणाची माहिती भाविकांना मिळावी यासाठी ठिकठिकाणी त्याबाबत फलक लावण्यात आले आहेत. प्रत्येक पॉईंटला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शौचालये पुढील मुक्कामाच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार
शौचालय वापरास योग्य आहेत याची खातरजमा करणे, योग्य नसल्यास संबंधित अधिकारी यांच्या लक्षात आणून देणे, मोबाईल शौचालयाचा वापर करण्याकामी नेमून दिलेल्या ठिकाणी मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी पालखी प्रस्थानापर्यंत थांबून वारकऱ्यांना प्रवृत्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालखी मुक्काम हलल्यानंतर ती शौचालये पुढील मुक्कामाच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहेत. शौचालय व्यवस्था पुरवण्यात काही अडचणी आल्यास अशा परिस्थितीत संबंधित नियुक्त कर्मचारी प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे कामकाज करणार आहेत. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ग्रामपंचायत तरडगाव व बरड येथे पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची गैरसोय होवू नये यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
प्रशासनातील सर्व विभाग समन्वयातून काम
फिरत्या शौचालयाच्या नियोजनासाठी तालुकास्तरावर ८६ ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक तसेच गट संसाधन केंद्रातील (पाणी व स्वच्छता ) प्रत्येक एक पॉईंटसाठी किमान तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांकडून जास्तीत जास्त सोयी सुविधांना प्राधान्य देण्यात आले आहे. वारकऱ्यांची कुठेही गैरसोय होवू नये यासाठी प्रशासनातील सर्व विभाग समन्वयातून काम करत आहेत.