येरळवाडी धरणाच्या लाभ क्षेत्रात उपसा बंदी, सिंचन विभागाने जप्त केल्या 18 विद्युत मोटारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सध्या खटाव तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली असून पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत येरळवाडी धरण डेड स्टॉकवर अखेरच्या घटका मोजत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी उपसा बंदी करण्यात आली आहे. तरीही काहीजण राजरोसपणे मोटारींच्या साहाय्याने रात्री पाणी उपसा करीत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. संबंधितांना सूचना देऊनही उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सायंकाळी कारवाई करत 18 विद्युत मोटारी जप्त केल्या.

खटाव तालुक्यातील बनपुरी, अंबवडे आणि येरळवाडी परिसरात शनिवारी सायंकाळी सिंचन विभागाने मोठी कारवाई केली. यामध्ये येरळवाडी ९, बनपुरी ३ आणि अंबवडे येथे ६, अशा एकूण १८ मोटारी जप्त करण्यात आल्या. यावेळी सिंचन विभागाकडून शेतकऱ्यांना सूचना देण्यात आली आहे. आता उपसा केल्यास यापेक्षाही कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला.

या कारवाईसाठी सिंचन विभागाने वाहनांचा व कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा आणल्याने लोक आश्चर्य व्यक्त करीत होते. वडूज मध्यम प्रकल्प सिंचन उपविभागाचे सहाय्यक अभियंता विकास बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता विजयकुमार फरांदे, कालवा निरीक्षक ए. बी. कदम, पी. एस. जाधव, के. एम. काळे, अनुरेखक, व अन्य कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

येरळवाडी धरणातील पाणी तळ गाठत चालले आहे. त्यामुळे पशुधन वाचवयचे कसे, याची शेतकऱ्यांना चिंता आहे. पशुधनासाठीच उपसा सुरू असल्याचे शेतकरी सांगत आहेत. शेतकऱ्यांनी ही वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आहे. दरम्यान, ज्या मोटारीवर कारवाई झाली आहे, त्या मोटारी मुख्य स्रोतापासून एक किलोमीटर लांब आहेत पशुधन वाचवण्यासाठी पाण्याची गरज असताना शेतकऱ्याऔची विनंती धुडकावून लावत ही कारवाई करण्यात आली आहे.