सातारा प्रतिनिधी | सातारा तहसीलदार कार्यालयाच्या वतीने आवारामध्ये पडून राहिलेल्या 18 वाहनांचा मंगळवारी लिलाव करण्यात आला. या लिलावातून तहसीलदार कार्यालयाला 18 लाख 93 हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई दरम्यान अठरा वाहने जप्त करण्यात आली होती. ही वाहने कित्येक दिवसांपासून तहसील कार्यालयाच्या आवारात पडून होती. या वाहनांच्या गर्दीमुळे पार्किंगचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.
ही वाहने इथून हटवावीत अशी तक्रार लोकशाही दिनामध्ये करण्यात आली होती. प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी ही मागणी लक्षात घेऊन वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया मान्यता देऊन सुरू केली.
तहसीलदार नागेश गायकवाड यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये चार ट्रॅक्टर, चार ट्रक, सहा ट्रेलर, एक लोखंडी बोट, तीन लोखंडी यारी, मोटारी व तीन लोखंडी जाळी यांचा समावेश होता.
एकूण 19 वाहने लिलावात होती. एका वाहनधारकाने लिलावापूर्वी पूर्ण रक्कम भरून वाहन सोडवून घेतले. लिलावासाठी निश्चित रक्कम दहा लाख 70 हजार रुपये होती. या लिलावत प्रत्यक्षात एकूण 18 वाहनांच्या लिलावाचा 18 लाख 93 हजार रुपये महसूल शासकीय जमा झाला.