कोरेगावमधील 18 EVM व्हीव्हीपॅटची होणार तपासणी; शशिकांत शिंदेंनी भरले 8.5 लाख रुपये

0
3

सातारा प्रतिनिधी | नुकत्याच राज्यात विधानसभा निवडणूका पार पडल्या. या निवडणुकीत अचानक वाढलेली मतदानाची टक्केवारी व ईव्हीएम व्हीव्हीपॅट बद्दल महाविकास आघाडीतील नेत्यांकडून तक्रार करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांनी ईव्हीएम व्हीव्हीपॅट तपासणीची मागणी केली आहे. त्यासाठीचे शुल्क ८ लाख ४९ हजार ६०० रुपये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे त्यांनी भरले आहेत. ही मतदान यंत्रे सध्या साताऱ्यात असून बेल (भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड) या कंपनीचे अभियंत्यांकडून ती तपासली जाणार आहेत.

ईव्हीएममधील मतांची व्हीव्हीपॅट- प्रमाणे जुळणी न झाल्यास किंवा मतांच्या प्रमाणात शंका निर्माण झाली तर पुनर्गणना केली जाऊ शकते. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये इच्छुक पक्ष किंवा उमेदवारांच्या अर्जावरून ही पुनर्गणना करू शकतात. त्यानुसार आ. शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात वापरलेली ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्सच्या तपासणीची मागणी अर्जाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स तपासणीसाठी संबंधित उमेदवाराला एका मशीनसाठी ४० हजार रूपये व त्यावर १८ टक्के जीएसटी भरावा लागतो. त्यानुसार आ. शशिकांत शिंदे यांनी ८ लाख ४९ हजार ६०० रूपये रक्कम २८ नोव्हेंबरला भरली आहे.

सीईओ यांनी दिलेल्या तारखेनुसार पाच दिवस अगोदर अर्जदारांना पूर्व कल्पनेसाठी नोटीस दिली जाते. त्यानंतर अर्जदार सांगतील त्या मतदान केंद्रांवरील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी २० नोव्हेंबरला मतदान होऊन २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर झाला आहे.

प्रिंट आऊट तपासण्याची व्यवस्था

भारत निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वसनीयता आणण्यासाठी ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन) आणि व्हीव्हीपॅट (वोटर वेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल) ही मतदान यंत्रे तयार केली आहेत. मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅट या मशिनवर एक पेपर स्लिप देऊन उमेदवाराला दिलेल्या मताची पुष्टी केली जाते. मतदानानंतर या पेपर स्लिपला ईव्हीएम यंत्राने मुद्रित केले जाते आणि ते एका यांत्रिक युनिटमध्ये सुरक्षित ठेवले जाते. निवडणूक आयोगाने मतदारांनी मतदान केल्यानंतर त्याचा प्रिंट आऊट तपासण्याची व्यवस्था केली आहे.

१८ ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची तपासणी करता येणार…

मतदारसंघात ३६५ मतदान केंद्रे होती. त्यावरील ७३० बीयू व तितक्याच सीयू तसेच व्हीव्हीपॅट मशीन त्याला जोडण्यात आला होत्या. एकूण मतदान यंत्रांच्या ५ टक्के मशीन्सची तपासणी करता येते. आ. शशिकांत शिंदे यांनी भरलेल्या रक्कमेनुसार १८ ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची तपासणी करता येणार आहे. त्यामध्ये ईव्हीएमधील मेमरी चीप काढून त्यावरील मतांची तपासणी होणार आहे. त्यासाठी बेल (भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड) कंपनीच्या अभियंत्यांना बोलावले जाणार आहे. त्यापूर्वी भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांच्याकडून मतदान यंत्रे तपासणीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.

मतदारसंघातील मतदारांमध्ये उत्सुकता

कोरेगाव विधानसभा मतदारसंघात नोटासह १७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मात्र खरी लढत महायुती-शिवसेना (शिंदे गट) उमेदवार आ. महेश शिंदे आणि मविआचे – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांच्यातच झाली. या निवडणुकीत आ. महेश शिंदे यांना १ लाख ४६ हजार १६६ मते तर आ. शशिकांत शिंदे यांना १ लाख १ हजार १०३ मते मिळाली. या निवडणुकीत आ. शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. मात्र या मतदार संघातील निवडणूक प्रक्रियेबद्दल आ. शशिकांत शिंदे यांनी साशंकता व्यक्त केली आहे. त्यांनी पुन्हा मतदान यंत्रे तपासणी मागणी केल्यामुळे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.