सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात घडत असलेल्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी पोलिसांची गस्त अधिक कडक होणार आहे. कारण जिल्हा पोलिस दलाच्या ताफ्यात चार पीसीआर व १३ दुचाकी अशी १७ नवीन वाहने दाखल झाली आहेत.
सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी घडणाऱ्या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांची गस्त सुरू असते. दिवसा व रात्रीही गस्त घातली जात असते. विशेष करून महामार्गावरील गुन्हे रोखण्यासाठीही विशेष गस्ती पथक जिल्हा पोलिस दलाकडून सुरू आहे; परंतु वाहनांअभावी गस्तीच्या आवर्तनावर परिणाम होत होता. त्यामुळे अनेक पोलिस ठाण्यांकडून वाहनांची मागणी होत असते. त्यानुसार पोलिस अधीक्षकांकडून गृहमंत्रालयाकडे ही मागणी वेळोवेळी कळविली जात असते.
गेल्या वर्षी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलिस दलाला मोठ्या प्रमाणावर वाहने मिळाली होती.त्यामध्ये २१ चारचाकी व दहा दुचाकींचा समावेश होता. या वाहनांमुळे निवडणूक कालावधीत रात्रगस्त, कोंबिंग ऑपरेशन व तपासणी नाक्यांवर प्रभावी काम करता आले. पोलिस दलाला आणखी वाहनांची आवश्यकता होती. गृहमंत्रालयाकडून मिळालेल्या निधीच्या माध्यमातून ही अडचण काही प्रमाणात कमी करण्यात आली आहे. या निधीतून पोलिस दलाला चार नवीन पीसीआर वाहने व १३ नवीन दुचाकी खरेदी करण्यात आल्या आहेत. ही वाहने जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांना दिली जाणार आहे.